K.Chandrasekhar Rao: मोदी सरकारने आतापर्यंत 9 राज्यातील सरकारं पाडली; देशाची मान खाली जात आहे, केसीआर यांचा पुन्हा एकदा भाजपावर घणाघात
के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. देशात सध्या अनेक चुकीच्या घटना सुरू आहेत. त्यामुळे देशाची मान खाली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी पुन्हा एकदा मोदींवर (PM Modi) हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी सरकार हे राज्यातील सरकार पाडण्यात व्यस्त आहे. आतापर्यंत त्यांनी चुकीच्या पद्धतीने 9 सरकारे पाडली आहेत. खरतर हा एक विक्रमच म्हणायला हवा, अशा शद्बांमध्ये के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर (BJP) टीका केली आहे. विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांची घोषणा करण्यात आली आहे. यशवंत सिन्हा यांना केसीआर सरकारने देखील पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर यशवंत सिन्हा हे तेलंगणामध्ये आले होते. यावेळी तेलंगणा राष्ट्र समितीच्या वतीने यशवंत सिन्हा यांच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये बोलताना केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. आमचा यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीला पाठिंबा असून, या निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे देखील केसीआर यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले केसीआर?
सध्या देशात अनेक चुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे देशाची मान खाली जात आहे. याविरोधात आता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रपतीपदांच्या उमेदवारांची तुलना झालीच पाहिजे. विरोधी पक्षांनी एकत्र येत यशवंत सिन्हा यांना विजयी केले पाहिजे. सिन्हा यांच्या विजयामुळे देशाची मान उंचावेल असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. यापूर्वी देखील त्यांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. दरम्यान सध्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये सुरू आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हैदराबादमध्ये आले होते. मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी गेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याची टीका भाजपाने केली आहे.
हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभू्मीवर हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जवळपास भाजपाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजप नते तेलंगणामध्ये अधिक सक्रिय झाल्याने केसीआर यांची चिंता वाढल्याची चर्चा आहे.