‘शेतकऱ्यांना दरवर्षी एकराला दहा हजार रुपये’, के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रात येवून मोठे संकेत
"महाराष्ट्रात तेलंगणा मॉडेल का बनू शकत नाही? आम्ही तलाठी बंद करून टाकले. तलाठ्यांना महाराष्ट्रात ब्रह्मदेव म्हटलं जातं. त्यांच्या मनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भात निर्णय घेतले जातात", असं के. चंद्रशेखर राव म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे आज बीआरएस पक्षाची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे बीआरएस पक्षाची मराठवाड्यातील ही तिसरी सभा आहे. या सभेसाठी बीआरएस पक्षाचे प्रमुख नेते तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सभेला मार्गदर्शन केलं. या सभेवेळी अनेक नगरसेवक आणि माजी आमदार यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देत सूचक वक्तव्य केलं.
चंद्रशेखर राव यांनी आगामी निवडणुकांमध्ये बीआरएस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन केलं. यासाठी त्यांनी आपल्या सरकारकडून तेलंगणात काय-काय उपाययोजना करण्यात आल्या याविषयी माहिती दिली. “पाण्याचं धोरण बदलावं लागेल, पाणी ईश्वराची देणगी आहे. पाण्याच्या बाबतीत आपला देश मागे आहे. पाणी असून देत नाही. महाराष्ट्रामध्ये BSRचे सरकार निवडून आणा. प्रत्येक घरात नळ दिला जाईल. पाण्याची कमतरता राहणार नाही. सर्वांना एकत्र येऊन लढावं लागलं. लाईट का देत नाही? हे मला समजत नाही”, असं के. चंद्रशेखर राव म्हणाले.
शेतकऱ्यांबद्दल नेमकं काय म्हणाले?
“महाराष्ट्रापेक्षा तामिळनाडूचे हाल जास्त होते. कमजोर राज्य होतं. पण तेलंगणात आज 24 तास लाईट आहे. मी दिलेले कोळशांचे आकडे जर चुकीचे असतील तर राजीनामा देईन. महाराष्ट्रात तेलंगणा मॉडेल का बनू शकत नाही? आम्ही तलाठी बंद करून टाकले. तलाठ्यांना महाराष्ट्रात ब्रह्मदेव म्हटलं जातं. त्यांच्या मनाप्रमाणे शेतकऱ्यांची जमीन संदर्भात निर्णय घेतले जातात”, असं राव म्हणाले.
“आम्ही शेतकऱ्यांना दरवर्षी एकराला दहा हजार रुपये देतो. त्यासाठी त्या शेतकऱ्यांना कुठे जावं लागत नाही. दलाल नाही. थेट त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतात”, असं म्हणत चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सूचक वक्तव्य केलं आहे. “आता आपल्यातलाच कोणीतरी आमदार झाला पाहिजे. जिल्हा परिषद निवडणूक जवळ आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील गुलाबी झेंडा फडकला पाहिजे”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
‘…तर बोट वाकडं करावं लागतं’
“महाराष्टात धनाची कमी नाही तर तनाची कमी, तुप सरळ बोटाने निघत नसेल तर बोट वाकडं करावं लागतं. मेक इन इंडियाच्या आणि डिजीटल इंडियाच्या नावाने लोकांना वेड्यात काढले जाते. मेक इन इंडियात चायना काय करते? तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात सुरू करा. मी महाराष्ट्रात येणार नाही. मध्य प्रदेशात जाईन. तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत गुलाबी झेंडा फडकवा. मग दिल्लीपासून लोक पळतपळत गावागावात येतील”, अशी टीका के. चंद्रशेखर राव यांनी केली.
“देशातील बुद्धिजीवी लोकांमध्ये आणि माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. आपल्या महान देशाचे ध्येय काय आहे? की भारत आपलं ध्येय विसरलाय का? मी जे काही बोलतोय ते इथंच ऐकून इथंच नका विसरु. लोकांमध्ये जाऊन चर्चा करा. लोकांमध्ये बोला. भारत भरकटला असेल तर आपला देश कुठं जाणार? ध्येयाशिवाय भारत भरकटला असेल तर कसं होईल? “, असा सवाल राव यांनी केला.
“नवीन उमेद घेऊन पुढे जायचं की जाग्यावरच राहायचं? महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नद्या आहेत. मात्र प्यायला पाणी देऊ शकत नाहीत. जनता प्यायचं पाणी मागतेय, तर सोन्याची वीट मागत नाही. एकीकडे रोजगार बंद होतोय. पण दुसरीकडे देशात जातीवाद, धर्मवाद, लिंग वाद सुरु आहे. श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, तर गरीब गरीब होत चालला. देशात बदल झाला पाहिजे. दुसरे देश येवून आपल्याला सुधारणार नाही”, असं के. चंद्रशेखर राव म्हणाले.
“देशात कितीतरी शेतकरी नेते होऊन गेले, ते लढत राहिले. शेतकऱ्यांना आज देशात 13 महिने दिल्लीत आंदोलन करावं लागलं. 750 लोकांना मरावं लागलं. या देशात काय चाललंय? डाळीत काही काळं आहे, पण काही लोक संपूर्ण डाळच काळी आहे, असं म्हणत आहेत”, अशी टीका त्यांनी केली.
“आता बदल महत्त्वाचा आहे. एक पक्ष हरला आणि दुसरा जिंकला म्हणजे परिवर्तन नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत. परिवर्तन झालं तरच देशाचा विकास होईल. इकडे शेतकरी मरत आहेत तर पंतप्रधान आफ्रिकेचा चित्ता दाखवत आहेत. परिवर्तन झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही”, असं राव म्हणाले.
“सिंगापूरच्या लोकांचे हाल आपल्यापेक्षा चांगले आहेत. आपण भारताला बदलू शकतो. परिवर्तनाशिवाय भारत पुढे जाऊ शकत नाही. देशात पूर्ण परिवर्तन होण्यापर्यंत ही लढाई सुरु राहील. देशातील नेता, पंतप्रधान आणि मंत्र्यांची इच्छाशक्ती नाही”, अशीदेखील टीका त्यांनी केली.