तेलंगणातल्या ‘या’ पक्षाची महाराष्ट्रात एंट्री, नांदेडमध्ये राजकीय घडामोडींना वेग
तेलंगणाचे मुख्यमंत्री नांदेडला सभा घेण्याचे नियोजन करत आहेत. पण त्यांच्या सभेला कितपत प्रतिसाद मिळतो याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे ही सभा यशस्वी व्हावी यासाठी वाहनांची मोठी व्यवस्था उभारण्यात येत असल्याचे समजतंय.
राजीव गिरी, नांदेडः महाराष्ट्र आणि कर्नाटक तसेच तेलंगणा (Telangana) सीमावाद शमण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. तोच तेलंगणा राज्यातून महाराष्ट्राला इशारा देणारी माहिती समोर आली आहे. नांदेडमध्ये (Nanded) गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तेलंगणातील बी आर एस पार्टी (BRS Party) महाराष्ट्रात विस्तारण्याच्या तयारीत आहे. नांदेडमध्ये या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या फेऱ्या आणि गाठीभेटी सुरु आहेत. तेलंगणातले बडे आमदार या पक्षाच्या विस्तारकार्यसाठी गेल्या काही दिवसांपासून नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. पक्ष वाढीसाठी त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चाही सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेडमध्ये काय घडतंय?
तेलंगणातील बीआर एस पार्टी नांदेडमधून महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री करणार आहे. त्या अनुषंगाने पक्ष वाढीसाठी बी आर एस नेत्यांच्या नांदेडमध्ये गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर येत्या 5 फेब्रुवारी रोजी नांदेड मध्ये सभा घेणार आहेत. तेलंगणाच्या बाहेर मुख्यमंत्री के सी आर यांची ही पहिलीच सभा असणार आहे. त्या अनुषंगाने नांदेडमध्ये जागेची पाहणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातल्या नेत्यांशी चर्चा?
दरम्यान तेलंगणाचे 4 आमदार नांदेडमध्ये तळ ठोकून असून त्यांनी स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांची भेट घेऊन त्यांना बी आर एस मध्ये येण्याचे निमंत्रण दिले. दरम्यान नांदेड च्या सभेत अनेक नेते, माजी आमदार खासदार बी आर एस मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा बी आर एस च्या आमदारांनी केलाय.
तेलंगणातले 4 आमदार नांदेडमध्ये..
गेल्या काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातील चार आमदार नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. आमदार जीवन रेड्डी, बलका सूमन , जोगु रमन्ना , हनुमंत शिंदे असे हे चार आमदार आहेत. नांदेडमधील सभा स्थळांची पाहणी त्यांच्याकडून सुरु आहे.
नांदेडमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच येत्या विधानसभा निवडणुका बीआरएस लढणार असल्याचं या आमदारांनी सांगितलंय. नांदेड जिल्ह्यातील सिमावर्ती गावानी तेलंगणात येण्याची इच्छा व्यक्त केली असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांना यायची गरज नाही . तेलंगणातील सुविधा देण्यासाठी आम्हीच महाराष्ट्रात येणार आहोत असं उत्तर त्यांनी दिलंय.
महाराष्ट्रातील सीमावर्ती भाग टार्गेट
नांदेडसह तेलंगणा सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील काही गावांना तेलंगणा राज्यात असलेल्या सेवा सुविधांची भुरळ पडलेली आहे. त्यामुळे आम्हाला तेलंगणा प्रमाणे सोयी द्या, अन्यथा आम्हाला तेलंगणात सामील करा अशा स्वरूपाची मागणी काही सीमावर्ती गावातील नागरिकांनी केली होती. त्यामुळे केसीआर यांच्या पक्षाने महाराष्ट्राकडे लक्ष देण्यास सुरुवात केलीय.
त्यातून आता तेलंगणाचे मुख्यमंत्री नांदेडला सभा घेण्याचे नियोजन करत आहेत. पण त्यांच्या सभेला कितपत प्रतिसाद मिळतो याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे ही सभा यशस्वी व्हावी यासाठी वाहनांची मोठी व्यवस्था उभारण्यात येत असल्याचे समजतंय. त्याचबरोबर केसीआर शेजारच्या राज्यात किती लोकप्रिय आहेत हे तेलंगणात दाखवण्याचा प्रयत्न आहे, त्यातून आगामी काळात तेलंगणातील सत्ता कायम राहावी असा सुप्त हेतू असल्याचे दिसतय.