शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार? ठाकरे गटाचे उरलेले आमदार ऑन दी वे, कधीही भाजपात येणार; नारायण राणे यांचा दावा
काही लोक टिंगल टवाळी करत आहेत. मिमिक्री करत आहेत. यांचा कसला बालेकिल्ला? जे बोलत आहेत. त्यांचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राचा राजकीय स्तर घसरलेला नाही.
पुणे: शिवसेनेला मोठं खिंडार पडल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी उद्धव ठाकरे यांची डोकंदुखी वाढवणारं विधान केलं आहे. शिवसेना संपलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले सहा ते सात आमदार तेही ऑन दी वे आहेत. ते कोणत्याही वेळी भाजपमध्ये (bjp) प्रवेश करतील, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. तसेच ठाकरे गटाचे कोणते आमदार भाजपमध्ये येणार यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देश आहे. उद्धव ठाकरे यांचं राजकारण फक्त आणि फक्त मातोश्रीपुरतं मर्यादित आहे. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांचा गट संपला आहे. शिवसेना कुठे राहिली आहे? 56 वरून सहा ते सात आमदार उरले आहेत. तेही वाटेवर आहेत. ऑन दी वे आहेत. एनी मुव्हमेंट ते सहभागी होतील, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
पुण्यात रोजगार मेळाव्यालाही त्यांनी संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरुण तरुणींना नोकरी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न करत होते त्यातील 10 लाख नोकऱ्या देण्याचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या दिल्या आहेत. पंतप्रधानांनी चांगले काम केले आहे. 75 हजार नोकऱ्या दिल्या. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना आनंद आहे. कोणी राजकारण करत असेल तर दिवाळी निमित्त काही बोलणार नाही, असं ते म्हणाले.
राज्यातील जनतेला दिवाळीचं रेशन मिळालं नाही. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. वाईट वाटत असेल तर विरोधकांनी शिधा द्यावा. विरोधकांना घर बसल्या काही काम उरलं नाही. ते फक्त टीका करत आहेत, अशी टीका राणे यांनी केली.
काही लोक टिंगल टवाळी करत आहेत. मिमिक्री करत आहेत. यांचा कसला बालेकिल्ला? जे बोलत आहेत. त्यांचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राचा राजकीय स्तर घसरलेला नाही. ज्या पक्षातील हे लोक आहेत. त्या पक्षाच्या लोकांनी तपासलं पाहिजे. तुम्हाला भास्करची भाषा आवडते का? माझीच मुलं कशी दिसतात? असा सवालही त्यांनी केला.
आपण सगळ्यांनी मोदींचं भाषण ऐकलं आहे. मागील आठ वर्षात पंतप्रधान मोदी आपल्या देशाला कसं आर्थिक सबलीकरणाकडे घेऊन जात आहेत ते त्यांनी सांगितलं आहे. भारत सुरक्षित आहे. काळजी करण्याची गरज नाही. कारण पंतप्रधानपदी मोदी आहेत, असंही ते म्हणाले.