ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, बाळासाहेब पाटील यांना संसर्ग

| Updated on: Aug 15, 2020 | 11:26 AM

बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची काही लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून अँटीजेन टेस्टसह आरटीपीसीआर चाचणी केली होती

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, बाळासाहेब पाटील यांना संसर्ग
Follow us on

कराड : ठाकरे सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (Thackeray Government Minister Balasaheb Patil Corona Positive)

बाळासाहेब उर्फ शामराव पांडूरंग पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. पाटील यांच्याकडे साताऱ्याच्या पालकमंत्रीपदाचीही धुरा आहे. बाळासाहेब पाटील हे 1999 पासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची काही लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून अँटीजेन टेस्टसह आरटीपीसीआर चाचणी केली होती. हा चाचणी अहवाल शुक्रवारी मध्यरात्री पॉझिटिव्ह आला.

कराडच्या कृष्णा रुग्णालयात बाळासाहेब पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या संपर्कात ते आले होते.

याआधी अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. हे सर्व मंत्री कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेले बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री ठरले आहेत.