ऋतुजा लटकेंनी 3 ऑक्टोबरलाच राजीनामा दिला होता; पण शिंदे सरकारने…, ठाकरे गटाचा गंभीर आरोप
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. यावरून विनायक राऊत यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. दोन्ही गटाकडून एकोंमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेकडून (Shiv sena) ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र बीएमसीने त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. याविरोधात लटके यांनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली आहे. आज लटके यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. मात्र ऋतुजा लटके यांना जर उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही तर पुढे काय? यासाठी ठाकरे गटाकडून प्लॅन बी देखील रेडी ठेवण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय म्हटलं राऊत यांनी?
विनायक राऊत यांनी ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावरून शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ऋतुजा लटके यांनी नियमानुसार तीन ऑक्टोबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला. नियमानुसार एक महिन्याचा पगार देखील महापालिकेत जमा केला. मात्र ऋतुजा लटके यांना आम्ही उमेदवारी देऊ नये, यासाठी शिंदे सरकारकडून महापालिका आयुक्तांवर दबाव आणला गेला, मी याचा निषेध करतो असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
‘महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत’
दरम्यान काँग्रेसने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. याबाबत विनायक राऊत यांना विचारले असता. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन उमेदवाराला पाठिंब दिला असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.