ठाकरे गट, NCP आणि काँग्रेसनं 451 ग्रामपंचायती जिंकल्या तरीही 352 ग्रामपंचायती जिंकणारा BJP आणि शिंदे गट अव्वल कसा काय?
ग्रामपंचायत निकालांमध्ये अनेक मोठ्या नेत्यांना धक्काही बसला. तर, काहींनी आपल्या गावात प्रतिष्ठा राखली.
मुंबई : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजप सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकत अव्वल राहिली. या आकडेवारीनुसार भाजप आणि शिंदे गट मिळून 352 ग्रामपंचायतींवर सत्ताधाऱ्याचे पॅनल जिकंले आहेत. तर ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मिळून 451 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. मात्र, या निकालावरुन सर्वपक्षीय नेत्यांचे दावे वेगवेगळे आहेत.
ग्रामपंचायत निकालांमध्ये अनेक मोठ्या नेत्यांना धक्काही बसला. तर, काहींनी आपल्या गावात प्रतिष्ठा राखली. रायगड जिल्ह्यात शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले आणि खालापूर आमदार महेंद्र थोरवेंनार घरच्या मैदानावर चितपट व्हावं लागल आहे.
भारत गोगावलेंच्या पॅनलचा त्यांच्याच गावात पराभव झाला. वास्तविक भारत गोगावलेंच्या पॅनलचे 10 उमेदवार जिंकले. मात्र, सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांचा उमेदवार पराभूत झाला.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिरगाव ग्रामपंचायतीत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना धक्का बसलाय. सरपंचपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार फरीदा काझी विजयी झाल्या.
वसईत 11 पैकी 6 ग्रामपंचायती श्रमजीवी संघटनेच्या ताब्यात गेल्या आहेत. श्रमजीवी संघटनेची मुख्य लढाई बहुजन विकास आघाडीविरोधात होती. बहुजन विकास आघाडीला 4 ग्रामपंचायतींवर समाधान मानावं लागलंय.
शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाईंनी मात्र सर्व जागा जिंकत पहिल्यांदाच पाटणकर गटाकडून सत्ता खेचून आणलीय. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातल्या मोरगिरी ग्रामपंचायतीत अनेक वर्षांनी सत्तांतर झालं. मंत्री शंभुराज देसाई यांच्या पॅनलनं सर्व जागा जिंकत राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला पराभूत केलं.