मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये सध्या भाजपकडून (BJP) जोर लावण्यात येत आहे. वरळीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, दुसरीकडे भाजपप्रमाणेच शिंदे गटाकडून देखील वरळी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. यावरून आता ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी महायुतीवर प्रतिक्रिय़ा देताना मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. वरळी मतदारसंघात सुनील शिंदे यांच्यावतीने फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी ते बोलत होते.
सुनील शिंदे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपकडून वरळी मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. यावर बोलताना सुनील शिंदे यांनी म्हटलं आहे की, राज्यात सध्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या कशा सोडायच्या याचा दृष्टीकोण सध्याच्या सरकारकडे नाही. ते केवळ वरळी मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रीत करत आहेत. यावरून त्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचं काम किती मोठं असावं याची कल्पना येते. आम्ही फक्त आता निवडणुकीची वाट पहात आहोत. निवडणुकीतून दाखवून देऊ असा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना शिंदे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महायुतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. दिवा जेव्हा तेजोमय होतो तेव्हा तो विझण्याच्या तयारीत असतो. अशा स्थितीमध्ये कोण कोणाला आधार देऊन मोठं करून पहात आहे. बुडत्याला काडीचा आधार अशी स्थिती आहे. मात्र महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेला हे चांगलं माहीत आहे. जनता योग्य वेळी उत्तर देईल असं आमदार शिंदे यांनी म्हटलं आहे.