दोन बर्थडे आणि एक अॅनिव्हर्सरी, पवार-ठाकरे कुटुंबाचं ‘तिहेरी सेलिब्रेशन’

| Updated on: Dec 13, 2019 | 7:59 AM

शरद पवार यांचा वाढदिवस, दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांचा वाढदिवस, तर रश्मी आणि उद्धव ठाकरे यांच्या लग्नाचा आज (13 डिसेंबर) 31 वा वाढदिवस असं ट्रिपल सेलिब्रेशन 'सिल्व्हर ओक'मध्ये साजरं करण्यात आलं.

दोन बर्थडे आणि एक अॅनिव्हर्सरी, पवार-ठाकरे कुटुंबाचं तिहेरी सेलिब्रेशन
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे कुटुंबाने ‘सिल्व्हर ओक’मधील पवारांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पवार आणि ठाकरे कुटुंबाने ट्रिपल सेलिब्रेशन केलं. राज्यात एकत्रित सत्तास्थापनेच्या आनंदाच्या जोडीला दोन वाढदिवस आणि एका लग्नाच्या वाढदिवसाची गोडी (Thackeray Pawar Family Celebration) होती.

शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली. त्यानंतर आणि त्यापूर्वीही पवार आणि ठाकरे कुटुंबातील ऋणानुबंध सर्वांनी पाहिले आहेत.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह भेट घेत शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांचा काल झालेला वाढदिवस तर आज (13 डिसेंबर) त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांचा वाढदिवस. तसंच रश्मी आणि उद्धव ठाकरे यांच्या लग्नाचा आज (13 डिसेंबर) 31 वा वाढदिवस असं ट्रिपल सेलिब्रेशन ‘सिल्व्हर ओक’मध्ये साजरं करण्यात आलं.

शरद पवार यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बळीराजा कृतज्ञता सोहळा पार पडला. सुप्रिया सुळेही काल दिल्लीत होत्या, त्या संध्याकाळी मुंबईत दाखल झाल्या. तर कार्ल्यात एकवीरा देवी आणि शिवनेरी किल्ल्याच्या दौऱ्यावर असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेतली.

पवार-ठाकरे कुटुंबाच्या सेलिब्रेशनला शरद पवार, प्रतिभा पवार, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, कन्या रेवती आणि विजय सुळे यांचीही उपस्थिती होती. सुप्रिया सुळेंनी ट्विटरवर फोटोही शेअर केला आहे.

शुभेच्छांबरोबरच केक कापण्याचा कार्यक्रमही पार पडला. एकूणच कालचा दिवस पवार आणि ठाकरे कुटुंबाच्या ट्रिपल सेलिब्रेशनचा तर ठरलाच, सोबतच दोन्ही परिवारातील ऋणानुबंध अधिक घट्ट (Thackeray Pawar Family Celebration) करणाराही.