ठाकरे, शिंदे की फडणवीस? मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती कुणाला? कुणाच्या किती जागा? काय सांगतो ‘हा’ सर्व्हे
'न्यूज एरिना इंडिया' सर्व्हेत ठाकरे गटाला किती जागा मिळणार याचे थेट आकडे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 'कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी असाच सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
मुंबई : भाजप, शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना विधानसभा निवडणुकीत रंगणार हे स्पष्ट आहेच. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे सांगणारा एक सर्व्हे समोर आला आहे. राज्यात पुन्हा फडणवीस सरकार येणार असे भाकीत या सर्व्हेने वर्तविले आहे. ‘न्यूज एरिना इंडिया’ संस्थेने हा सर्व्हे केला असून यात उद्धव ठाकरे गटाला किती जागा मिळणार याचे थेट आकडे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ‘न्यूज एरिना इंडिया’ संस्थेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करत सत्ता स्थापन केली. त्यामुळे या सर्व्हेचे महत्व वाढले आहे.
महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, संजय राऊत, नाना पटोले हे शिवसेना – भाजप युतीला निवडणूक घेण्याचे वेळोवेळी आव्हान देत आहेत. मात्र, अशी निवडणूक झाल्यास महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांची परिस्थिती काय असेल हे सांगणारा ‘न्यूज एरिना इंडिया’ संस्थेचा सर्व्हे आहे.
राज्यात विधानसभेची निवडणूक झाल्यास भाजपला 123 ते 129 जागा मिळतील. तर, शिंदे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला अवघ्या 25 जागा मिळतील. त्याखालोखाल राष्ट्रवादीला 55 ते ५6, काँग्रेसला 50 ते 53 आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 17 ते 19 जागा मिळतील असा अंदाज या सर्वेमधून व्यक्त करण्यात आला आहे.
विभागनिहाय भाजपचे आमदार किती?
भाजपचे सर्वधिक आमदार विदर्भातून निवडून येतील असे हा सर्वे सांगत आहे. विदर्भात 30 ते 31, खान्देशमध्ये 23, मराठवाड्यात 19, पश्चिम महाराष्ट्र्र 22 ते 23 आणि कोकणसह मुंबईत 29 जागा निवडून येतील असे ‘न्यूज एरिना इंडिया’च्या सर्व्हेत म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच
राज्यातील 35 टक्के जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. तर अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना 21 टक्के जनतेने पसंती दिली आहे. 12 टक्के जनतेला विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे. तर, देशातील पाच लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या रांगेत जाऊन बसलेले उद्धव ठाकरे यांच्या नावावर फक्त 9 टक्के जनतेने शिक्कामोर्तब केले आहे.