ठाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, रवींद्र परदेशी यांच्या मृत्यूने खळबळ
ठाण्यातील 41 वर्षीय रवींद्र परदेशी यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती झाली होती.
निखिल चव्हाण, ठाणे : मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात (Thane) काल रात्री खळबळजनक घटना घडली. येथील एका शिवसेना पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. रवींद्र परदेशी (Ravindra Pardeshi) असं या नेत्याचं नाव आहे. ते ठाण्यातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख होते. नुकतीच एकनाथ शिंदे यांनी रवींद्र परदेशी यांची या पदावर नियुक्ती केली होती. काल ठाण्यातील भर बाजारपेठेत रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अज्ञात व्यक्तीच्या या हल्ल्यात रवींद्र परदेशी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होत होता. अशा अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.रुग्णालयात तत्काळ उपचार सुरु करण्यात आले. मात्र आज त्यांच्या मृत्यूची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रवींद्र परदेशी हे ठाण्यातील शिंदे गटाचे नेते होते.
अज्ञातांकडून हल्ला
ठाण्यातील शिवेसनेचे उपविभाग प्रमुख रवींद्र परदेशी हे ठाण्यातील खारकळ अळी येथे ते रहात होते. तर जांभळी नाका परिसरात ते व्यवसाय करत असत. रस्त्यावर कॉस्मेटिक्स विक्रीचा त्यांचा हा व्यवसाय चालत असे. मात्र काल रात्री दहा वाजेच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी निघाले असताना एका अज्ञात व्यक्तीने मागून येऊन त्यांच्या डोक्यावर चॉपरने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. या प्रकारानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रुग्णालयात शिवसैनिकांची गर्दी
रवींद्र परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये खळबळ माजली. काल रात्रीपासूनच रुग्णालय परिसरात शिवसैनिकांची गर्दी जमू लागली. शिवसैनिकांनी घडल्या प्रकाराबाबत पोलिसात तक्रारही दाखल केली. या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे, याचा तपास लवकरात करावा, अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.
हल्ला का झाला?
ठाण्यातील 41 वर्षीय रवींद्र परदेशी यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती झाली होती. रवींद्र परदेशी यांच्यावरील हल्ला सध्या तरी काही राजकीय हेतूने झाला नसावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. ठाणे पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे. यात पक्षाचा संबंध नसावा, असं प्राथमिक चौकशीतून दिसत आहे. तर काही वैयक्तिक कारणामुळे हा खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. या फेरीवाल्यांच्या वादातून हा हल्ला झाल्याचं म्हटलं जातंय. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.