ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा राडा झाला. ठाण्याच्या किसन नगरमध्ये कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. सगळ्यात आधी भट वाडीत हाणामारी झाली. नंतर ठाण्यातील (Thane) श्रीनगर पोलीस स्टेशन बाहेर राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यावर शिंदे गटातील काही जणांनी पाण्याची बाटली फेकून मारली असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
रात्री उशिरा शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी श्रीनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडला होता. त्यावेळी हा प्रकार घडला. सध्या या राड्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र या घटनेवरुन आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीय.
पोलिसांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला. अखेर सौम्य लाठीचार्जही करण्याची वेळ ओढावली. यावेळी एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, पोलिसांनी संरक्षण देत राजन विचारे यांना बाहेर काढलं. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जातोय.
खरंतर या राड्याआधी सोमवारी संध्याकाळी देखील ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री देखील कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेत. दरम्यान, हा राडा करण्यासाठी ठाण्याबाहेरुन माणसं मागवण्यात आली होती, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलाय.
ठाण्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकारण कमालीचं तापलंय. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच ठाण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागात अनेकदा शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यातील दादरमध्ये गणपती विसजर्नावेळी झालेली दोन्ही गटातील संघर्ष तुफान गाजला होता.