दक्षिण भारतातल्या सर्वात मोठ्या पक्षाची भाजपप्रणित एनडीएत एंट्री!
चेन्नई : लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष एआयएडीएमकेची आता एनडीएमध्ये एंट्री झाली आहे. भाजप आणि एआयडीएमके तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढणार आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी चेन्नईत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. तामिळनाडूतील एकूण 39 लोकसभेच्या जागांपैकी भाजपला पाच जागा देण्याचा निर्णय झाल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. पत्रकार […]
चेन्नई : लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष एआयएडीएमकेची आता एनडीएमध्ये एंट्री झाली आहे. भाजप आणि एआयडीएमके तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढणार आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी चेन्नईत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. तामिळनाडूतील एकूण 39 लोकसभेच्या जागांपैकी भाजपला पाच जागा देण्याचा निर्णय झाल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं.
पत्रकार परिषदेत ओ पन्नीरसेल्वम म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजप पाच जागांवर लढेल. आम्ही पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत सोबतच लढू. तर पियुष गोयल म्हणाले, आम्ही तामिळनाडूत विधानसभेसाठी 21 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत एआयएडीएमकेला साथ देऊ. राज्यात पन्नीरसेल्वम आणि पलानीसामी यांच्या नेतृत्त्त्वात, तर केंद्रात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली जाईल.
एआयएडीएमकेचं आणखी एक यश म्हणजे तामिळनाडूतील पीएमकेलाही सोबत घेण्यात आलंय. पीएमकेला सात जागा आणि राज्यसभेत एक जणाला खासदारकी दिली जाणार आहे. तामिळनाडूत होणाऱ्या 21 जागांच्या पोटनिवडणुकीत पीएमके एआयएडीएमकेला समर्थन देणार असल्याचं एआयएडीएमकेच्या नेत्यांनी सांगितलं.
2014 च्या निवडणुकीत पीएमकेचाही एनडीएमध्ये समावेश होता आणि पीएमकेने आठ जागांवर निवडणूक लढली होती. यापैकी एका जागेवर विजय मिळाला होता. दुसरीकडे डीएमके आणि काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष असतील. पीएमकेला महाआघाडीत आणण्यासाठी डीएमकेकडूनही प्रयत्न करण्यात आले. पण या प्रयत्नांना यश आलं नाही.
एआयएडीएमकेने 2014 ला कुणाचंही समर्थन न घेता निवडणूक लढवली होती. 39 पैकी 37 जागा एआयएडीएमकेने जिंकल्या होत्या. तर एनडीएला केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या. काँग्रेस आणि त्यांचा मित्र पक्ष डीएमकेला खातंही उघडता आलं नव्हतं. तामिळनाडूत एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाची स्थिती कमकुवत झाली आहे. शिवाय पक्षातच अनेक गट पडले आहेत.