ज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही : विनोद तावडे
एका झेंड्याचा दांडा पकडायला माणसं नाहीत, तुमचा झेंडा कोण खांद्यावर घेणार असा सवाल भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना केला.
मुंबई : एका झेंड्याचा दांडा पकडायला माणसं नाहीत, तुमचा झेंडा कोण खांद्यावर घेणार असा सवाल भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना केला. ज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत, त्यांना भगव्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही, असा घणाघात विनोद तावडेंनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सभांमध्ये यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) छायाचित्र असलेला भगवा झेंडाही (Saffron Flag) फडकणार आहे. घड्याळ चिन्हाच्या झेंड्यासोबत भगवाही फडकवण्याची घोषणा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी परभणीतल्या पाथरीमध्ये आयोजित शिवस्वराज्य यात्रेत केली.
त्याबाबत बोलताना विनोद तावडे यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं.
तावडे म्हणाले, “अजितदादा तुमच्याकडे एक झेंडा आहे, त्याचा दंडा पकडायला माणसं नाहीत. तो झेंडा कोण घेणार खांद्यावर? तुमचे पक्षाचे मंडळी सोडून चालली आहेत, मग झेंडा झेंडा काय करता? छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा घेऊन चालत नाही तर शिवाजी महाराजांनी जे शिकवलं आहे ते अंमलात आणणार आहोत का? रयतेला न लुटता रयतेला घडवणं हे महाराजांनी केलं. आपल्या काळात किती घोटाळे झाले, आपण रयतेच आपण काय केलं हे विसरू नका. झेंडा मानाने, प्रेमाने, खंबीरपणे त्याचा दंडा पकडणारा कार्यकर्ता हा उभा राहिला पाहिजे. जो तुमच्या सगळ्या नेत्यांना बघून पळत सुटला आहे आणि नेतेही पळत सुटले आहेत”.
भगवा परंपरेचं प्रतिक
“भगवा झेंडा हा हिंदुत्वा मुद्दाच नाही. भगवा झेंडा हा आपल्या परंपरेचं प्रतिक आहे. मंदिरात भगवा झेंडा असतो. वारीला जातो त्या वारकऱ्याकडे भगवा झेंडा असतो. भगवा झेंडा हा मुळात त्यागाचं प्रतिक आहे. आपले सगळे गुरु, महाराज हे सगळे भगवे असतात, कारण ते त्यागाचं प्रतिक आहे. त्यागाचे प्रतिक घेऊन जे राज्य करतात ते त्याग करतात. त्यामुळे स्वार्थ करणारे ज्यांच्यावर राज्य सरकारी बँकेतील घोटाळ्यामुळे गुन्हे दाखल करा म्हटले आहे, त्यांना भगव्या झेंड्याला हाथ लावण्याचा अधिकार नाही”, असा घणाघात तावडेंनी अजित पवारांवर केला.
संबंधित बातम्या
पवारांच्या हाती भगवा, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भगवा फडकवण्याचे आदेश