शिंदे गटाचे ते 16 आमदार लवकरच अपात्र? ‘लवकर’ म्हणजे किती दिवस? उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नेमकं काय सांगितलं?
आता तपासणी पलीकडे काही मार्ग नाही. कितीही दिवस तपास केला तरी तो ठरलेलाच आहे. पण, तपास हा तपासच असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही अशी मिश्किल टिप्पणी झिरवळ यांनी केली.
नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या गटाचा व्हीप नाकरल्यावरून उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र केले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सोपवला आहे. लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात यावा असेही कोर्टाने म्हटले आहे. त्यानुसार आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रते प्रकरणी दोन्ही शिवसेनेची घटना तपासणी करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. यावरून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खरमरीत टोला लगावला आहे.
सुप्रीम कोर्टाने ज्या दहा बारा बाबी सांगितल्या आहेत त्या सगळ्याच विरुद्ध आहेत. फक्त, एकच बाब आहे ती अध्यक्षांना तपासायला दिली आहे. त्यामुळे आता तपासणी पलीकडे काही मार्ग नाही. कितीही दिवस तपास केला तरी तो ठरलेलाच आहे. पण, तपास हा तपासच असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही अशी मिश्किल टिप्पणी झिरवळ यांनी केली.
लवकरात लवकर निर्णय घेणे ही केवळ राजकीय व्यासपीठावरील सभागृहाची भाषा असते. निर्णय हा काही लवकर लागतच नाही. तसे या विषयात फार तपास करण्यासारखे काहीच नाही. मात्र, तरी त्यांना खात्री करण्याचा अधिकार आहे आणि ते करतील असे झिरवळ म्हणाले.
हा तपास किती दिवसात पूर्ण होणार आणि लवकर म्हणजे किती ते मी काही सांगू शकत नाही. कारण, लवकर म्हणजे आजही होऊ शकतो, तीन दिवसात होऊ शकतो किंवा सहा महिने झाले तरी लवकरच म्हणावे लागेल असा टोला त्यांनी लगावला.
शिवसेना ( शिंदे गट ) विधिमंडळातील प्रतोद बदलण्याच्या हालचाली करत आहे. पण, शिवसेनेला प्रतोद बदलणे इतके सोपे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.