Aaditya Thackeray: प्रकल्पावर नाही तर ‘या’ गोष्टीवरच खोके सरकारचे लक्ष, ठाकरेंनी पुन्हा हिणवले..!
महाविकास आघाडी सरकार या प्रकल्पावर लक्ष ठेऊन होते. शिवाय मविआ सरकारच्या काळातच सर्व प्रक्रिया ही पूर्ण झाली होती. असे असताना सत्तांतर होताच हा प्रकल्प गुजरातला गेला.
पुणे : वेदांता प्रकल्प (Vedanta Project) आता गुजरातला गेला असला तरी याबाबत नेमके काय झाले? हे आता विरोधक जनतेला सांगत आहेत. राज्य सरकारच्या (State Government) दुर्लक्षामुळेच आज लाखो बेरोजगारांना मिळणारे काम गुजरातला गेले आहे. सरकारच्या मनमानी कारभाराचा रोष व्यक्त करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मावळ येथील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढला होता. राज्य सरकारला वेदांता प्रकल्प गेल्याचे दुख: नाहीतर गटामध्ये कुणाचे इनकमिंग होणार यावरच त्यांचे लक्ष असल्याचा टोला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी लगावला आहे. सर्वकाही ठरूनही हा प्रोजेक्ट गुजरातला गेलाच कसा याचे उत्तरही राज्य सरकारकडे नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकार या प्रकल्पावर लक्ष ठेऊन होते. शिवाय मविआ सरकारच्या काळातच सर्व प्रक्रिया ही पूर्ण झाली होती. असे असताना सत्तांतर होताच हा प्रकल्प गुजरातला गेला. मविआचे सरकार असते आक्रोश मोर्चा ऐवजी आज जल्लोष मोर्चा काढवा लागला असता असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील पोषक वातावरणामुळे मोठ-मोठे प्रोजेक्ट हे राज्यात येतात. शिवाय असे प्रोजेक्ट आपल्या राज्यात खेचून नेण्यासाठी स्पर्धा ही असतेच. पण राज्य सरकार कमी पडल्यानेच हा प्रोजेक्ट गुजरातला गेला. या स्पर्धेत महाराष्ट्र टिकू शकला नाही हे दुर्देव असल्याचेही ठाकरे म्हणाले आहेत.
ज्याप्रमाणे सत्तांतर करण्यासाठी आमदारांनी गुजरात, गुवाहटी आणि गोवा असा प्रवास केला, त्याचप्रमाणे आता वेदांता प्रोजेक्टही महाराष्ट्रामध्ये आणला जाणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला केला आहे. तेवढीच तत्परता प्रोजेक्टबाबत दाखवली असती बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते असेही ते म्हणाले.
दरम्यानच्या काळात प्रकल्पाच्या अनुषंगाने बैठका पार पडल्या होत्या, ठिकाणही ठरले होते, सर्वकाही निश्चित झाले असताना खोके सरकारची स्थापना होताच हा प्रोजेक्ट गुजरातला गेलाच कसा असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
तळेगाव येथील जनआक्रोश मोर्चामध्ये शिवसैनिकासह तरुणही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाचे रुपांतर हे सभेत झाले आणि आदित्य ठाकरे यांनी हा प्रोजेक्ट गुजरातला जाण्यास शिंदे सरकार कसे जबाबदार राहिले हेच पटवून दिले आहे.