बावखळेश्वर मंदिर पाडण्यामागे सेनेचा हात, गणेश नाईक यांचा गंभीर आरोप
नवी मुंबई : नवी मुंबईमधील बावखळेश्वर मंदिर पाडण्यामागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा हात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी केला. बावखळेश्वर मंदिर उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्यामुळे तोडण्यात आलं, असं व्यंगचित्र असलेले पत्रकही घराघरात वाटण्यात आलेत. यामुळे नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रावदी […]
नवी मुंबई : नवी मुंबईमधील बावखळेश्वर मंदिर पाडण्यामागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा हात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी केला. बावखळेश्वर मंदिर उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्यामुळे तोडण्यात आलं, असं व्यंगचित्र असलेले पत्रकही घराघरात वाटण्यात आलेत. यामुळे नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रावदी यांच्यात वाद उफाळून आला आहे.
या प्रकरणानंतर शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. शिवसैनिकांनी काही पत्रकं ताब्यात घेतली आहेत आणि गणेश नाईक यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे, तर गणेश नाईक यांनी हे व्यंगचित्र आचारसंहिता लागू व्हायच्या आधीचे असल्याचं म्हटलं आहे. गणेश नाईक यांच्या गंभीर आरोपामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आल्याचे दिसत आहे.
काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईतील प्रसिद्ध असे बावखळेश्वर मंदिर तोडण्यात आले. यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात मंदिर तोडण्यास विरोध केला होता. मात्र इतका विरोध असतानाही मंदिर तोडण्यात आले. यामुळे स्थानिकांनी राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली होती.
बावखळेश्वर मंदिर पाडण्यामागे शिवसेनेचा हात आहे. शिवसेना एकीकडे नसलेले राम मंदिर बांधण्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे असलेली मंदिरं पाडत आहेत. बावखळेश्वरच्या बाबतीत उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुद्दाम हे मंदिर पाडावे यासाठी प्रयत्न केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात देव, धर्म आणि देशाची भावना खोटी आणि भपंक आहे, असं गणेश नाईक म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांचे चित्र असलेली हजारो पत्रकं नवी मुंबईत वाटण्यात येत होती. यावेळी शिवसैनीकांनी ती पकडून पोलिसांना दिली. तसेच याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, तर विरोधी पक्षाकडे कोणताही विषय नसल्याने धर्माचा विषय काढत असल्याचा आरोप शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी पत्रकार परिषदेत केला.