नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात 250 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र या हल्ल्यावर विरोधीपक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. अनेकांनी या हल्ल्याचे पुरावे मागितले आहे. मात्र विरोधीपक्षाच्या या प्रश्नाला केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी हटके उत्तर दिलं आहे. त्यांनी रात्री 3.30 वा. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्वीट केले.
“रात्री 3.30 वाजता मच्छर खूप आहेत, ते मी हिटने मारले. आता मच्छर किती मारले आहेत, हे मोजत बसू की झोपू?, असं व्ही. के. सिंह यांनी आपल्यामध्ये ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
रात ३.३० बजे मच्छर बहुत थे,
तो मैंने HIT मारा।
अब मच्छर कितने मारे, ये गिनने बैठूँ,
या आराम से सो जाऊँ? #GenerallySaying
— Vijay Kumar Singh (@Gen_VKSingh) March 6, 2019
महत्त्वाचं म्हणजे भारतीय वायूदलाने पाकिस्तानमध्ये जो हवाई हल्ला केला होता, तो पहाटे 3.30 च्या सुमारासच केल्याने, व्ही के सिंह यांनी त्याचवेळी ट्विट करुन, विरोधकांना चपराक लगावली.
सध्या देशात शहीद जवानांच्या नावावरही सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तसेच या हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नेमके किती दहशतवादी मारले गेले याचा पुरावा सरकारने द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून सतत केली जात आहे.
दरम्यान माजी क्रिकटेपटू आणि पंजाबमधील काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनीही नुकतेचे भारताच्या एअर स्ट्राईकवर शंका उपस्थित करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. “दहशतवादी मारायला गेले होते की, झाडं तोडायला गेले होते”, असे म्हणत सिद्धू यांनी भारतीय वायूसेनेची थट्टा केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नुकतंच एका कार्यक्रमात एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला होता. यावर विरोधकांनी अमित शाह यांच्याकडे दहशतवादी मारले गेल्याचा आकडा कुठून आला?, असा सवाल विचारला.
एअर स्ट्राईकमध्ये किती लोक मारले गेले, यावर वायूसेनेचे प्रमुख बी.एस. धनोआ यांनीही आक्रमक उत्तर दिले. “भारतीय वायूसेनेचे काम मारणे आहे, मृतांची संख्या मोजणे नाही, किती लोक मारले गेले हे मोजणे सरकारचं काम आहे” असं धनोआ म्हणाले होते.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी “एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारेले गेले याचा आकडा आज किंवा उद्या समोर येईल. भारतीय एअर फोर्सने स्ट्राईक केल्याची कबुली दिली आहे हा मोठा पुरावा आहे”, असं म्हटलं.