निकाल दिल्लीहून लिहून आला?; राहुल नार्वेकर यांचं विरोधकांना प्रत्युत्तर काय?
महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर काल निकाल दिला आहे. राहुल नार्वेकर यांनी 1200 पानी निकाल पत्र इंग्रजीतून वाचून दाखविले. हा निकाल दिल्लीहून टाईप करून आला आहे असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी राहुल नार्वेकर यांची रोखठोक मुलाखत घेतली. त्यात त्यांनी या आरोपावर स्पष्टपणे उत्तर दिले आहे.
मुंबई | 11 जानेवारी 2024 : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा बहुप्रतिक्षित निकाल काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. आपल्या निकालाने दोन्ही गटांचा रोष असून या रोषाला घाबरुन हा निकाल दिलेला नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी टीव्ही 9 मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. कायद्यात अपात्रतेसंबंधीत तरतूदी आहे त्यानूसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांना आधारभूत मानून हा निकाल दिल्याचे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने हा निकाल दिल्लीवरुन टाईप करुन दिल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यावर देखील त्यांनी मुलाखतीत भाष्य केले आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी आमदार अपात्रतेच्या दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेत काल अखेर आपला निकाल दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर शिवसेना पक्षाने टीका केली आहे. याबाबत टीव्ही 9 मराठी चॅनलला दिलेल्या विशेष मुलाखतीत राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की कायद्यात अपात्रतेसंबंधित तरतुदी आहे त्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या गाईडलाईन दिल्या त्यानुसार आम्ही निर्णय देतो. त्यामुळे कुणाला वाईट वाटतं कुणाला काय वाटतं. त्याच्याशी आमचा संबंध नाही. आम्हाला कायद्याला पुढे न्यायचं आहे. सामान्य लोकांचा संसंदीय लोकशाहीवरचा विश्वास वाढावा हे काम करायचं आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल नार्वेकर यांनी मुलाखतीत म्हटले की, माझ्यावर आरोप करण्यात आला की मी वेळकाढूपणा करतोय. नंतर म्हणाले तुम्ही अॅप्लिकेशन अलाऊ का करता?. तुम्ही एक्स यांना भेटला. त्यांना भेटला. हे सर्व दबाव टाकण्याचे प्रयत्न आहेत. मी दिलेला निर्णय सुस्पष्ट आहे. तुम्ही केवळ आरोप करण्यापेक्षा माझ्या निर्णयात काय नियमबाह्य आहे, काय घटनाबाह्य आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाचं कुठं उल्लंघन झालं हे दाखवून देणं अधिक योग्य राहिल. आरोप कोणीही करतं, आरोप करणं अवघड नसतं. जे आरोप केले गेले आहेत, जे मुद्दे आहेत त्याला कायदेशीर बॅकिंग आहे असेही त्यांनी म्हटले.
दिल्लीहून निकाल आला, असा आरोप विरोधक करत आहेत ?
तुमच्या देहबोलीवर लक्ष होतं. तुम्ही का अडखळला. दिल्लीहून निकाल आला, असा आरोप विरोधक करत आहेत असे विचारले असता त्यांनी आपण कुठे अडखळलो असे मला वाटत नाही. कोणता माणूस पावणे दोन तास वाचन करतो आणि एकदाही वाचताना शब्द चुकत नाही. दीडशे पानांची ऑर्डर आहे. त्यात लाखो शब्द आहेत. अशा आरोपांवर उत्तर देणंही योग्य नाही. उद्या म्हणतील दिल्लीवरून आलं. परवा म्हणतील लंडनवरून आलं. नंतर म्हणतील अमेरिकेवरून आलं. मग मी काय नाचत बसू दिल्ली लंडन अमेरिका. लंडनमधून ड्राफ्टिंग झालं की काय असंही म्हणतील. मी निर्णय दिला तो न वाचता तोंडपाठ न करता तुम्हाला मी निर्णय सांगू शकत असेल, काय कारणं आहेत, कशाला निर्णय दिला, याचा अर्थ विचार करून स्वत: घेतलेला निर्णय आहे. कुणी तरी हा निर्णय लिहून दिला असता तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला रोखठोक उत्तर देण्याची क्षमता माझ्यात नसती असेही राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.