मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shind) यांनी बंडखोरी करत मोठा राजकीय भूकंप केला. शिवसेनेतील आमदार आणि खासदारांचा पाठिंबा मिळवत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षावरच दावा केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी देखील शिंदे गटाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दादर येथील शिवसेना भवन (Shivsena Bhavan) हे शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आहे. शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करत असल्याची चर्चा सुरु असतानाच शिदें गटाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलला आहे. शिंदे गटाच्या लेटरहेडवर दादरच्या शिवसेना भवनाऐवजी ठाण्याच्या टेंभी नाक्याचा पत्ता देण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या नियुक्ती पत्रावर हा नविन पत्ता टाकण्यात आला आहे.
प्रथमच शिंदे गटाने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांची मुंबईतील विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रावर नव्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता दिला आहे. शिंदे गटाकडून जारी केलेल्या नियुक्ती पत्रावर ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा पत्ता टाकण्यात आला आहे. याआधी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून दादर येथील शिवसेना भवनचा उल्लेख केला जात असे. मात्र, शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या नियुक्ती पत्रकावर प्रथमच ठाण्यातील आनंदआश्रमच्या पत्त्याचा उल्लेख मध्यवर्ती कार्यालय असा करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आता शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, आणि शिवसेना भवन कुणाचं? असा प्रश्न उपस्थित झाले होते. शिंदे गट ‘शिवसेना भवन’ ताब्यात घेणार असल्याची चर्चा रंगली होती. यावर शिंदे गटाने खुलासा केला होता. शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करणार नाही असेही शिंदे गटाकडून सांगण्यात आले होते. शिंदे गट मुंबईत प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याची चर्चा देखील रंगली होती.