Ramdas Kadam : आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतर शिंदे गटही आक्रमक..! आता जशाच तसे उत्तर
गद्दार आणि बंडखोर म्हणून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला सातत्याने हिणवले आहे. शिवाय केवळ स्वार्थासाठी त्यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी जागोजागी केला होता. त्याला आता शिंदे गटातील नेते काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे. सर्व आरोपांना उत्तर मात्र मिळणार असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी : शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर आक्रमक असलेल्या (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (Shiv Sanwad rally) शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले होते. शिवाय मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला आहे. मात्र, आता ही यात्रा अंतिम टप्प्यात असताना (Eknath Shinde) शिंदे सरकारनेही एक अनोखा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. शिंदे गटही मेळावे घेणार असून याची सुरवात दापोलीतूनच होणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम यांच्यावर भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केली होती. याला उत्तर म्हणूनच आता शिंदे गटाचा पहिला मेळावा दापोलीत होत आहे.
आदित्य ठाकरे यांनी राज्यभर शिवसंवादच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. पण याकरिता शिवसैनिकांची गर्दी नव्हती तर त्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तो मेळावा एक स्टंटबाजी असून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिंदे गट मेळाव्यांचे आयोजन करणार असल्याचे ते म्हणाल आहेत.
शिंदे गटाच्या मेळाव्यांना दापोलीतून सुरवात होणार आहे. आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला होणाऱ्या गर्दीतूनच उत्तर दिले जाणार आहे. त्यामुळेच रविवारी शिंदे गटाचा मेळावा दापोली येथे झालेल्या आदित्य ठाकरेंच्या सभेला आव्हान देणारा असेल असेही कदम म्हणाले आहेत.
दापोलीमध्ये आगोदर शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. यामध्ये रॅली आणि मुख्य मार्गावर शक्तीप्रदर्शन असणार आहे. वातावरण निर्मित करुन पु्न्हा शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. शिवाय या मेळाव्यात केवळ शिवसैनिकच असतील असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला आहे. रामदास कदम आणि आमदार योगेश कदम शक्ती प्रदर्शन करतील.
गद्दार आणि बंडखोर म्हणून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला सातत्याने हिणवले आहे. शिवाय केवळ स्वार्थासाठी त्यांनी ही भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी जागोजागी केला होता. त्याला आता शिंदे गटातील नेते काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे. सर्व आरोपांना उत्तर मात्र मिळणार असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे.