विमानात तांत्रिक बिघाड, शिवसेनेच्या 40 नगरसेवकांचा जीव थोडक्यात बचावला
ठाणे : संसदेचा दौरा करण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील शिवसेना नगरसेवकांचा जीव थोडक्यात बचावला आहे. सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान गो एअर कंपनीच्या विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर 35 ते 40 मिनिटांचे अंतर कापल्यानंतर विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता हे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवले गेले. विमानामध्ये तब्बल 40 ते 45 नगरसेवक […]
ठाणे : संसदेचा दौरा करण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील शिवसेना नगरसेवकांचा जीव थोडक्यात बचावला आहे. सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान गो एअर कंपनीच्या विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर 35 ते 40 मिनिटांचे अंतर कापल्यानंतर विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता हे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवले गेले. विमानामध्ये तब्बल 40 ते 45 नगरसेवक प्रवास करत होते. प्रवास करत असलेल्या नगरसेवकांनी मुंबई विमानतळावर उतरल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या विमानाने दिल्लीला रवाना करण्यात आले.
खासदार राजन विचारे यांच्यावतीने ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासाठी संसदेचे कामकाज कशा पद्धतीने चालते हे पाहण्यासाठी एका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये 40 ते 45 नगरसेवक प्रवास करत होते. मात्र खासदार या विमानांमधून प्रवास करत नव्हते.
सकाळी विमानाने व्यवस्थित उड्डाण घेतल्यानंतर तब्बल 40 मिनिटांनी विमानामध्ये काही तरी बिघाड झाला असल्याची आम्हाला माहिती देण्यात आली. मात्र काय तांत्रिक बिघाड झाला आहे यांची माहिती दिली नाही, अशी प्रतिक्रिया या विमानामध्ये प्रवास करणारे शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांनी दिली.
वेळेत सतर्कता दाखवल्यामुळे आमचे प्राण वाचले, तर अचानक तांत्रिक बिघाड झाला आहे, एवढीच माहिती आम्हाला देण्यात आल्यानंतर पुन्हा मुंबईला उतरवण्यात आले, असं कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.
सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील आपण या दौऱ्याला जाणार होतो मात्र काही कामानिमित्त आपल्याला जायला जमले नसले, तरी या प्रकारणाची चौकशी होईल, अशी अपेक्षा आहे, असं सांगितलं
दरम्यान दुपारी पावणेतीनच्या दरम्यान हे सर्व नगरसेवक दिल्लीला पोहचले असल्याची माहिती दौऱ्यातील नगरसेवकांनी दिली आहे.