मुख्यमंत्र्यांच्या रथाचं चाक चिखलात रुतलं, गरागरा फिरलं, मुनगंटीवार-विखे खाली उतरले!
मुख्यमंत्री रथाच्या टपावर होते. तर त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील सहकारी सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटीलही होते. चिखलात रुतलेलं चाक जागच्या जागी गरागरा फिरु लागले.
चंद्रपूर : मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात भाजपची महाजनादेश यात्रा (BJP Mahajanadesh Yatra) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं मूळ गाव चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथं पोहोचली. इथे स्थानिकांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी, काकू शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत केलं. या स्वागताचा स्वीकार करुन मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत आपली भूमिका मांडली. सभा आटोपून मुख्यमंत्री बाहेर पडत असताना मैदानात पावसामुळे तयार झालेल्या चिखलात त्यांच्या रथाचे चाक रुतलं.
यावेळी मुख्यमंत्री रथाच्या टपावर होते. तर त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील सहकारी सुधीर मुनगंटीवार आणि राधाकृष्ण विखे-पाटीलही होते. चिखलात रुतलेलं चाक जागच्या जागी गरागरा फिरु लागले.
त्यामुळे रथ चिखलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु झाला. कार्यकर्ते चपळाईने मदतीसाठीपुढे सरसावले.पण रथ काही केल्या हलेना. मग, मुख्यमंत्री रथाच्या टपावरून उतरून आपल्या आसनावर आले. तर, मुनगंटीवार आणि विखे पाटील रथावर आलेला भार कमी करण्याकरिता खाली उतरले. कार्यकर्त्यांनीही शर्थीची ताकद लावत रथ चिखलातून मागे ढकलत बाहेर काढला.
एव्हाना चिखलात रुतलेल्या रथाला बघण्यासाठी आजूबाजूला तोबा गर्दी झाली होती. चिखलातून मागे गेलेला रथ मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी रणनीती ठरली. रथ वेगात पळवायचा असे चालकाने ठरवले. पण तसं करताना तो कुणाच्या अंगावर कलांडू नये यासाठी आजूबाजूच्या गर्दीला सुरक्षा यंत्रणेने पांगवलं.
चालकाने रथ टॉप गियरवर टाकत जोरात हाकला आणि तो मुख्य रस्त्यावर आणला. आता परिस्थिती नियंत्रणात होती. मुनगंटीवार आणि विखे पाटील पुन्हा रथात चढले आणि मुख्यमंत्री आपल्या पुढच्या सभेसाठी चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले.