सहा मतदान केंद्रावर एकही मतदान नाही
भुवनेश्वर : लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी (11 एप्रिल) पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 जागांसाठी मतदान झाले. तसेच चार राज्यातील विधानसभा जागांसाठीही मतदान झाले. 91 लोकसभा जागेवर एकूण 1,279 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र ओदिशामधील सहा मतदान केंद्र असे आहेत की, तेथे दिवसभरात एकही मतदान झालं नाही. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. ओदिशाचे मुख्य निवडणूक […]
भुवनेश्वर : लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी (11 एप्रिल) पहिल्या टप्प्यात 20 राज्यातील 91 जागांसाठी मतदान झाले. तसेच चार राज्यातील विधानसभा जागांसाठीही मतदान झाले. 91 लोकसभा जागेवर एकूण 1,279 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र ओदिशामधील सहा मतदान केंद्र असे आहेत की, तेथे दिवसभरात एकही मतदान झालं नाही. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
ओदिशाचे मुख्य निवडणूक अधिकारी सुरेंद्र कुमार म्हणाले, मल्कानगरी जिल्ह्याच्या चित्रकोंडामधील सहा मतदान केंद्रांवर लोकांनी मतदान केलं नाही. नक्षलवाद्यांच्या भितीमुळे लोक घरातून बाहेर पडले नाहीत.
ओदिशामध्ये गुरुवारी पहिल्या टप्प्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदान पार पडलं. यावेळी पहिल्या सहा तासांत जवळपास 41 टक्के मतदारांनी आपला अधिकार बजावला. मतदान केंद्रावरुन मिळालेल्या माहितीनुसार, 1 वाजेपर्यंत अंदाजे 41 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे, असं मुख्य निवडणूक आयोगाचे अधिकारी सुरेंद्र कुमार यांनी सांगितलं.
कालाहांडी, नबरंगपूर, बेरहामपूर आणि कोरापूट या चार लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 28 विधानसभा क्षेत्रात मतदान झाले. 28 विधानसभा क्षेत्रातील 20 मतदान केंद्रे नक्षल प्रभावित असल्याने या ठिकाणी संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. बाकी आठ ठिकाणी मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होते, अशी माहिती सुरेंद्र कुमार यांनी दिली.
सुरेंद्र कुमार म्हणाले, नक्षल प्रभावित विभागात विशेष सुरक्षा ठेवण्यात आली होती. दरम्यान, गावातील रस्त्याचे काम न केल्याने भवानीपटना विधानसभा मतदारसंघातील 666 गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
पहिल्या टप्प्यात एकूण 60,03,707 मतदरांमध्ये पुरुष – 29,72,925, स्त्री – 30,30,222 आणि तृतीयपंथी 560 मतदान केलं. पहिल्या टप्प्यातील चार लोकसभा जागांसाठी एकूण 26 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर 28 विधानसभा जागांसाठी 191 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ओदिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक 11, 18, 23 आणि 29 एप्रिल अशा चार टप्प्यात होणार आहे. मतमोजणी 23 मे ला होणार आहे.