काँग्रेसच्या आघाडीत किती पक्ष उरलेयत हे आता तपासायला हवे, नवी मजबूत आघाडी उभारण्याची गरज: राऊत
काँग्रेस पक्ष दुबळा झाला असला तरी तो देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आसाम या राज्यांमध्ये अजूनही काँग्रेसची चांगली ताकद आहे. | Sanjay Raut Congress
जळगाव: सध्या देशात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) किती पक्ष उरले आहेत, हे तपासण्याची वेळ आली आहे. कारण, भविष्यात भाजपला टक्कर देण्यासाठी नवी मजबूत आघाडी स्थापन करण्याची गरज असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. (Shivsena MP Sanjay Raut on Sharad Pawar and Prashant Kishor meet in Mumbai)
ते शनिवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्तरावर यूपीएऐवजी नवी आघाडी स्थापन करण्याचे सूतोवाच केले. या देशातील प्रादेशिक पक्ष आणि भाजप विरोधकांनी एकत्र आणून मजबूत आघाडी उभे करणे गरजेचे आहे. पण विरोधी पक्षांची ही आघाडी काँग्रेस पक्षाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण काँग्रेस पक्ष दुबळा झाला असला तरी तो देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आसाम या राज्यांमध्ये अजूनही काँग्रेसची चांगली ताकद आहे. यासंदर्भात देशातील प्रमुख नेते चाचपणी करत असतील तर नक्कीच त्यातून भविष्यात दृश्य फळ बघायला मिळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट म्हणजे राजकारणात उलथापालथ करणारी घटना: राऊत
यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीसंदर्भातही भाष्य केले. प्रशांत किशोर हे कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत. त्यांचे काम वेगळ्या प्रकारचे असते. त्यांना आम्ही सुद्धा अनेकदा भेटलो आहोत. उद्धव ठाकरे पण भेटले आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांनी आमच्यासाठी तसेच काँग्रेससाठी पण काम केले आहे. ते एक प्रोफेशनल राजकीय रणनीतीकार आहेत. जर एखाद्या पक्षाचे प्रमुख नेते त्यांना भेटून चर्चा करत असतील तर ते त्यांच्या पक्ष कार्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा केली असेल. प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट ही राजकारणातील मोठी उलथापालथ करणारी घटना असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
‘जळगावातून शिवसेनेचा खासदार निवडून आणणार’
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे बळ आहे. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूक आम्ही आमच्या बळावर जिंकू आणि यशस्वी होऊ. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार झाला, महापौर झाला आता खासदार शिवसेनेचा व्हावा, अशी अपेक्षा शिवसैनिकांची आहे. आम्ही ती निश्चित पूर्ण करू, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
(Shivsena MP Sanjay Raut on Sharad Pawar and Prashant Kishor meet in Mumbai)