Uday Samant : वेदांतामध्ये ‘डील’ झाले, ज्यांनी आरोप केले त्यांचीच होणार का चौकशी? उद्योगमंत्र्याचे थेट अव्हान
वेदांता प्रकल्प हा गुजरातला गेला हे राज्याच्या दृष्टीने हानीकारक आहेच, पण आगामी काळात त्यापेक्षा मोठे प्रोजेक्ट राज्यात कसे आणता येतील याबाबत रणनीती आखली जाणार आहे.

रत्नागिरी : महाराष्ट्रात होणारा ‘वेदांता’ प्रकल्प आता गुजरातला उभा केला जात आहे. यावरुन राज्यात गेल्या तीन दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप हे सुरु आहेत. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीतही पकडण्याचा प्रयत्न केला आहे, तर हे प्रकल्प मविआ सरकारच्या काळातच गुजरातला गेल्याचे सत्ताधारी पटवून सांगितले आहे. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर वेदांताच्या बाबतीत डील झाली असून याबाबतीतले पुरावे लवकरच आपल्याकडे येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. पुरावे हाती पडताच संबंधितांची चौकशी केली जाणार असल्याचा इशारा सामंत यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी काळात उद्योग खात्यामध्ये काय उद्योग झाले आहेत, याचा शोध आता शिंदे सरकार घेणार आहे. वेदांताबाबतही मविआ सरकारच्या काळात डील झाली असल्याचा आरोप उद्योगमंत्री सामंत यांनी केला आहे. याबाबतीत नारायण राणे आणि आशिष शेलार यांच्याकडे पुरावे असून त्यांच्याकडून पुरवे मिळताच संबंधितांची चौकशी केली जाणार आहे.
सध्या आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा सुरु आहे. त्यांच्या सभांना 400 खुर्च्यांमध्ये खेळ उरकत आहे. यातही आजूबाजूचे किती निष्ठावंत याचा अभ्यास त्यांनी करणे गरजेचे असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे. बळच आणलेले आवसान अधिक काळ टिकत नसते असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.
ज्या अनंत गिते यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ओढले ते आता कसे एकनिष्ठ असल्याचे दाखवत आहेत. आमच्या विरोधात बोलण्यासाठीही यांच्याकडे कोणी नसल्याने अशा प्रकारची माणसे उभी करावी लागत आहेत. त्यामुळे ते जेवढे अधिक बोलतील तेवढे अधिक माझे मतदार बोलून दाखवतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे.
वेदांता प्रकल्प हा गुजरातला गेला हे राज्याच्या दृष्टीने हानीकारक आहेच, पण आगामी काळात त्यापेक्षा मोठे प्रोजेक्ट राज्यात कसे आणता येतील याबाबत रणनीती आखली जाणार आहे. त्यामुळे उद्योगाबरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे.
केवळ गद्दार म्हणून हिणवल्याने काही फरक पडणार नाही. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात चीड निर्माण होईल. शिवाय त्यांच्यासाठी हे अशोभनीय असल्याचे सामंत म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत उत्तर देणार असल्याचे सामंत म्हणाले आहेत.