मुंबादेवी येथून एकनाथ शिंदे गटाने शायना एनसी यांना उमेदवारी दिलेली आहे. यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी बाहेरचा उमेदवार दिल्याची टीका करताना इम्पोर्टेड माल नाही चालणार अशा आशयाचे विधान केले होते. यावरुन अरविंद सावंत यांना भाजपाने घेरले आहे.आता यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अरविंद सावंत यांची बाजू घेतली आहे. संजय राऊत यांनी यात महिलांचा काहीही अपमान झालेला नसल्याचा दावा केला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की अरविंद सावंत आमचे मोठे नेते आहेत. शायना एनसी मुंबादेवी येथून निवडणूक लढवित आहेत आणि त्या मुंबादेवी येथील रहिवासी नाही. स्थानिक भूमिपूत्र नाहीत. तर याचा एवढा इश्यू का केला जात आहे असा उलट आरोप राऊत यांनी केलेला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की अरविंद सावंत आमचे सन्मानिय नेते आणि खासदार आहेत. एवढेच नाही, महायुतीच्या एकनाथ शिंदे गटाने उमेदवारी दिलेली महिला उमेदवार मुंबा देवी क्षेत्राच्या बाहेरील आहेत. इम्पोर्टेट माल आहेत. जर बाहेरुन आणलेला उमेदवार असेल तर त्याला इम्पोर्टेट म्हटलं तर या महिलांचा अपमान कुठे झाला? तुम्ही सोनिया गांधी यांच्याबद्दल काय म्हटले होते. प्रियंकाजी यांच्या बद्दल काय म्हटले होते. तुम्ही जरा तुमचा ( भाजपाचा ) दहा ते पंधरा वर्षांचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल ? असाही टोला संजय राऊत यांनी यावेळी भाजपाला लगावला आहे.
या प्रकरणात नागपाडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल निवडणूक आयोग आणि महिला आयोगाने घेतली आहे. हा महिलांच्या सन्मानाचा लढा आहे असे या प्रकरणात महायुतीच्या उमेदवार शायना एनसी यांनी म्हटले आहे. जेव्हा त्यांनी मी इम्पोर्टेट माल असल्याचे वक्तव्य केले तेव्हा त्यांच्या शेजारी मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल हसत पाहात होते. जर कोणतीही व्यक्ती महिला असो की पुरुष केलेल्या कामाच्या आधारे बोलत असेल तुम्ही डिबेट करायला तयार होत नाही, पण वैयक्तिक टीका करता. ही छोटी गोष्ट नाही.आम्ही टीव्हीवर चर्चेत सहभाग घेतो. मुद्दे मांडतो आणि घरी जातो असेही शायना यांनी म्हटले आहे.