महाविकास आघाडी होणारच नाही, कुणी केला सर्वात मोठा दावा ? पडद्यामागे मोठ्या हालचाली?
मनोहर जोशींसोबत काम करण्याचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. दुर्दैवाने त्यांच्या जीवनात एक दिवस असा आला की दसरा मेळाव्याच्या सभेतून इतरांनी त्यांना स्टेजवरुन खाली उतरवलं आणि त्यांना याचा आघात इतका झाला की त्यानंतर शिवसेनेच्या सभेत ते कधी बोलले नाहीत. राज ठाकरे यांना पुन्हा सोबत घेऊन काम करावे अशी भूमिका त्यांनी मांडली, त्यावेळी सुद्धा त्यांना खूप विरोध केला गेला असेही या नेत्याने सांगितले.
छत्रपती संभाजीनगर | 23 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहेत. केव्हाही लोकसभा निवडणूकाच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यात महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही लोकसभा जागांचे वाटप निश्चित झालेले नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्हीकडे आपआपल्या जागा वाढविण्यासाठी दावे-प्रतिदावे केले जात आहे. आता शिवसेना पक्षात फूट घडविल्यानंतर भाजपाने राष्ट्रवादीला देखील खिंडार पाडल्याने लोकसभा जागा वाटपाचा तिडा वाढत चालला आहे. तर आता एका नेत्याने महाविकास आघाडी होणारच नाही असा दावा करुन खळबळ उडविली आहे.
जागा वाटपाचे मुद्द्यावर बोलताना…
‘तुम्हाला मी एक सांगतो की ही आघाडी कधीही होणार नाही. ते वंचितलाही बरोबर घेत नाहीत, राजू शेट्टींना बरोबर घेत नाही आणि आता काँग्रेस देखील त्यांच्याबरोबर युतीमध्ये लढायला तयार नाही, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. उबाठा गटाचा प्रवक्ता स्टेटमेंट देतो त्यावर सगळं चालू आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही आघाडी होणारच नाही हे माझं ठाम मत आहे. इंडिया आघाडीचा प्रश्न येतच नाही. महाराष्ट्रात सुद्धा यांची आघाडी होणारच नाही. तुम्ही 26-27 तारखेपर्यंत वाट पहा आणि मग तुम्हालाच कळेल की कशी युती होते असेही शिरसाट म्हणाले.
ते पुढे म्हणाले की यांचे भांडण सुरु आहे ते उबाठा गटाचं अस्तित्व कमी झाल्याने सुरु आहे. त्यामुळे निश्चितच काँग्रेसला जास्त जागा पाहिजेतआणि त्या घेतल्याशिवाय कॉंग्रेस थांबणार नाहीत. शरद पवार यांना सुद्धा माहिती आहे की त्यांच्या अस्तित्वाची लढाई जर लढायची असेल तर काही जागा या आपल्या पदरात आल्या पाहिजेत. त्यातच प्रकाश आंबेडकर यांना इतका मोठा सपोर्ट भेटत आहे. त्यांच्याही पारड्यात काहीतरी पडलं पाहिजे ना ? प्रकाश आंबेडकरांना सुद्धा चांगल्या जागा दिल्या तर ते युती करतील. प्रत्येकाची एक महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे मी वारंवार सांगत आलेलो आहे की ही आघाडी होणार नाही असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
आमच्याकडे वाद नाही !
आमची युतीत कोणत्याही प्रकारची बोलणी झालेली नाहीत आणि ती होईल वेळी त्यावेळी चित्र स्पष्ट होईल. परंतु फॉर्म्युला असाच ठरलेला आहे की ज्यांना ज्या जागा आम्ही पूर्वी लढलेल्या आहेत, त्या जागा आम्हीच लढणार आहोत. आता फक्त आमच्याबरोबर आलेले अजित दादांची असलेली डिमांड काय ? यावर आम्ही दोन्ही पक्ष सामोपचाराने निर्णय घेऊ म्हणून आमच्याकडे वाद होण्याची शक्यता नाही असं मला वाटतं असाही दावा संजय शिरसाट यांनी केला.