राष्ट्रवादी पक्ष अजितदादांच्या हाती येण्यासाठी महत्वाची ठरली ही दोन कारणे
कॉंग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात पोहोचविला. पण, तोच पक्ष आता त्यांचेच पुतणे अजित पवार यांच्या हाती गेला आहे.

मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : गेले काही महिने राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचे यावरून शरद पवार आणि अजितदादा गट या दोन्ही गटांमध्ये वाद सुरु होता. हा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात जाऊन पोहोचला होता. अखेर! केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षांचे घड्याळ हे चिन्ह अजितदादा गटाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकापूर्वी हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, शरद पवार गटातील नेते हा निर्णय आम्हाला अपेक्षित होता असेच सांगत आहेत. त्यामुळे यामागचे नेमके राजकारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, अजितदादा यांच्या हाती राष्ट्रवादी पक्ष येण्यामागे दोन मोठी कारणे आहेत.
कॉंग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात पोहोचविला. पण, तोच पक्ष आता त्यांचेच पुतणे अजित पवार यांच्या हाती गेला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड केले. भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाले. त्यावेळीच पक्ष आणि चिन्ह कुणाकडे यांची लढाई सुरु झाली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविला. निवडणुक आयोगाने जेव्हा हा निर्णय घेतला त्यावेळी विरोधी पक्ष असणारे अजितदादा यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. आमदारांच्या संख्याबळावर पक्ष कुणाचा हे ठरविता येत नाही असे अजितदादा म्हणाले होते. पण, विधानसभेतील आमदार, राज्यसभा, लोकसभेतील खासदार यांच्या बळावरच अजितदादा यांनीही राष्ट्रवादीवर आपला दावा सांगितला.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निर्णय देताना जो निकष लावला तोच निकष शरद पवार यांच्यासाठीही लावण्यात आला. ज्या गटाकडे जास्त आमदार, खासदार त्या गटाकडे पक्ष आणि चिन्ह असा हा निकष होता. त्याचवेळी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे जाणार याची कल्पना शरद पवार गटातील नेत्यांना होती. त्यामुळेच हे नेते अपेक्षित निकाल असल्याचे सांगत आहेत. विधानसभेत अजितदाद यांच्याकडे असलेले अनेक आमदारांचे संख्याबळ ही अजितदाद यांच्या जमेची बाजू ठरली आणि त्यांच्यकडे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आले.