नवी दिल्ली | 18 फेब्रुवारी 2024 : नेत्याचे कार्यकर्ते गावात घरोघरी जातात. सुंदर महिला आणि मुलींची यादी तयार करतात. रात्री त्या महिला आणि मुली यांचे अपहरण केले जाते. रात्रभर त्यांच्यावर बलात्कार करून दुसऱ्या दिवशी त्यांना घराबाहेर हाकलून दिले जाते. अनेकदा पक्ष बैठकीच्या नावाखाली महिलांना कार्यालयात बोलावले जाते. पक्ष कार्यालयातच क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात. या विरोधात कुणी तक्रार केली तर त्या महिलेच्या पतीला, वडिलांना खोट्या प्रकरणात अटकवले जाते. संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला जातो. लोकसभा निवडणुकीपूर्वीच हे प्रकरण उजेडात आल्याने एकच खळबळ माजली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगासमोर काही पीडित महिलांनी आपबिती सांगितली आहे. विशेष म्हणजे या घटना महिला मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये घडल्या आहेत. ज्या नेत्याने हे निंदनीय कृत्य केले आहे तोही तृणमूल कॉंग्रेस पक्षाचाच नेता आहे. सध्या हा नेता फरार आहे.
उत्तर परगणामधील तृणमूल कॉंग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्यावर या महिलांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी गावाचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणामुळे पश्चिम बंगालसह दिल्लीतही खळबळ उडाली आहे. संदेशखळी गावातील महिलांनी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्यासह त्यांचे दोन सहकारी शिव प्रसाद आणि उत्तम सरदार यांच्यावर अत्याचार आणि बलात्काराचा आरोप केला आहे.
शाहजहान शेख यांच्यावर धमकी देऊन जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही संदेशखळी गावातील महिला आजही घाबरलेल्या स्थितीत आहेत. पोलिसांनी सध्या गावाला सुरक्षा कवच (गार्ड) दिले आहे. मात्र, गार्ड हटवताच शहाजहान शेख यांचे कार्यकर्ते पुन्हा त्रास देतील, अशी भीती महिलांना वाटते.
राष्ट्रीय महिला आयोगाने आपल्या अहवालात तक्रारी प्राप्त होउनही पश्चिम बंगाल पोलीस कारवाई करत नाहीत. त्यामुळे पोलिसांची टीएमसी नेत्यासोबत मिलीभगत असल्याचे आयोगाने अहवालात म्हटले आहे. शाहजहान शेख याच्याविरोधात महिलांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस त्यांच्याकडे वैद्यकीय अहवाल मागतात. एवढेच नाही तर पोलीस तिच्या पतीला खोट्या प्रकरणात अटक करून संपूर्ण कुटुंबाला त्रास देतात, असेही या अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे.
दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे नेते शाहजहान शेख हे फरार आहेत. रेशन घोटाळ्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध ईडीची चौकशी सुरू आहे. शहाजहान याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.