मुंबई : आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या रॅलीच्या (Aditya Thackeray Election Rally) माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज (Aditya Thackeray filing Nomination) दाखल केला. मात्र, आदित्य ठाकरेंच्या या रॅलीत पाकिटमारांनीही (Pocket Theft) शक्तीप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. गर्दीच्या ठिकाणी खिसे कापणाऱ्या टोळ्या नेहमीच सक्रीय असतात, मात्र एका दिग्गज राजकीय नेत्याच्या रॅलीतच चोरांनी आपला हात साफ केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे चोरांनी सचिन अहिर (Sachin Ahir), आशिष चेंबूरकर (Ashish Chemburkar), हरीश वरळीकर (Harish Waralikar) या दिग्गज राजकीय नेत्यांचं पाकिटही मारलं. यामुळे तिघांनाही काही हजार रुपयांचा फटका बसला.
आदित्य ठाकरे अर्ज भरताना वडील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील या रॅलीत सहभागी झाले होते. असं असतानाही चोरी पाकिटमारांनी हातचलाखी करत दिग्गज नेत्यांनाही लक्ष्य केलं. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
वरळीतील इतर स्थानिक नेत्यांची पाकिटं देखील चोरीला गेली आहेत. अनेकांच्या सोन्याच्या साखळ्या देखील चोरांनी लंपास केल्या. यात निरंजन नलावडे यांच्या सोनसाखळीचा समावेश आहे. या रॅलीत जवळपास 100 हून अधिक जणांना चोरांनी लुटलं आहे. चोरांनी गर्दी आणि धक्काबुक्कीचा फायदा उचलला आहे. आतापर्यंत वरळी आणि ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एकूण 13 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोअर परळ येथील ‘शिवालय’ या शिवसेना शाखेतून आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज (Aditya Thackeray filing Nomination) भरायला निघाले. ते बीडीडी चाळ-वरळी नाका मार्गे निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरायला दाखल झाले.