हा भाजप आमदार झोपडीत राहतो, पक्क्या घरासाठी लोकांनी वर्गणी जमवली!
भोपाळ : राजकीय नेत्यांचा थाट आपण नेहमीच पाहतो. पण अत्यंत दुर्मिळ नेते सापडतात, ज्यांची परिस्थिती ही सर्वसामान्यांसारखीच असते. मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार सीताराम आदिवासी हे देखील या दुर्मिळ नेत्यांपैकीच एक आहेत. मध्य प्रदेशातील विजयपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवलाय. अजूनही ते कच्च्या घरात राहतात. सीताराम यांना घर बांधण्यासाठी स्थानिक लोकांनी वर्गणी जमा केली आहे. या […]
भोपाळ : राजकीय नेत्यांचा थाट आपण नेहमीच पाहतो. पण अत्यंत दुर्मिळ नेते सापडतात, ज्यांची परिस्थिती ही सर्वसामान्यांसारखीच असते. मध्य प्रदेशातील भाजपचे आमदार सीताराम आदिवासी हे देखील या दुर्मिळ नेत्यांपैकीच एक आहेत. मध्य प्रदेशातील विजयपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवलाय. अजूनही ते कच्च्या घरात राहतात. सीताराम यांना घर बांधण्यासाठी स्थानिक लोकांनी वर्गणी जमा केली आहे. या पैशातून आता घर बांधलं जाईल.
सीताराम यांनी नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते रामनिवास रावत यांच्यावर मात केली. सीताराम यांची या मतदारसंघातून ही तिसरी निवडणूक होती. 2008 आणि 2013 च्या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या रावत यांच्याकडून पराभव झाला होता. एका शेतकऱ्याप्रमाणेच सीताराम यांचं राहणीमान आहे. सीताराम त्यांच्या झोपडीबाहेर खाट टाकून झोपलेले दिसतात. तर सकाळच्या वेळी अंगावर शाल घेऊन कार्यकर्त्यांशी गप्पा मारतात आणि लोकांच्या समस्या ऐकून घेतात.
पक्क्या घरासाठी स्थानिकांनी वर्गणी जमवली
सीताराम हे श्योपूर जिल्ह्यातील पिपरानी गावात राहतात. याच गावात दोन खोल्यांचं पक्क घर त्यांच्यासाठी आता बनवलं जात आहे. आमचा नेता एवढ्या साध्या घरात राहतो याचं आम्हाला वाईट वाटतं म्हणून वर्गणी जमा केल्याचं समर्थक सांगतात. याचमुळे समर्थकांनी वर्गणी जमा केली आणि घर बांधायला सुरु केलं.
स्थानिकांशी सीताराम यांची नाळ असल्याचं बोललं जातं. अगदी साध्यातल्या साध्या व्यक्तीसाठीही ते उपलब्ध असतात. आपल्याकडे पैसे नसल्यामुळे कुटुंबासोबत कच्च्या घरात राहतो, असं सीताराम सांगतात. लोकांनी 100 रुपये ते एक हजार रुपये या दरम्यान मदत केली आणि त्या पैशातून आता घराचं काम सुरु आहे.
राजकीय नेते निवडणूक लढताना जेव्हा संपत्ती जाहीर करतात तेव्हा ती कोट्यवधींमध्येच असते. पण सीताराम यांच्या बाबतीत असं नाही. सीताराम यांनी अनेक वर्ष संघर्ष केलाय, ज्यात त्यांच्या पत्नीनेही त्यांना साथ दिलीय. सीताराम यांनी निवडणुकीसाठी जे शपथपत्र दिलं, त्यानुसार त्यांच्याकडे 46 हजार 733 रुपये आहेत, ज्यात 25 हजार रुपये नगदी आणि 21 हजार 733 रुपये बँकेत आहेत. याशिवाय त्यांच्याकडे दोन एकर जमीन आणि 600 स्क्वेअर फूट आकारीच झोपडी आहे. या झोपडीच्या जागेची किंमत पाच लाख रुपये आहे.