स्मृती इराणी यांच्यावरील राहुल गांधी यांचे ते ट्विट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा, म्हणाले राजकारणात…

| Updated on: Jul 12, 2024 | 3:41 PM

स्मृती इराणी यांच्यावर होत असलेल्या या टीकेवरून राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी स्मृती इराणी यांची बाजू घेतली आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा होत आहे. तर, सोशल मीडियावर लोकही त्यांना भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

स्मृती इराणी यांच्यावरील राहुल गांधी यांचे ते ट्विट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा, म्हणाले राजकारणात...
RAHUL GANDHI AND SMRUTI IRANI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजपच्या स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्मृती इराणी यांना महिला आणि बालविकास खात्याचे मंत्रिपद देण्यात आले होते. तर, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी पराभव केला. दीड लाखांहून अधिक मतांच्या फरकाने स्मृती इराणी यांचा पराभव झाला. या पराभवानंतर स्मृती इराणी यांना दिल्लीतील बंगला सोडावा लागला. यावरून काँग्रेसच्या काही खासदारांनी टीका केली होती. तर, काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही स्मृती इराणी यांच्याबाबत मोठे विधान केले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यामधील वातावरण जोरदार तापले होते. राहुल गांधी यांनी जेव्हा अमेठीऐवजी रायबरेलीतून लढण्याची घोषणा केली होती. त्यावेळी स्मृती इराणी यांनी राहुल गांधी घाबरून दुसऱ्या मतदारसंघात गेले. रायबरेलीतूनही त्यांना पराभवाची चव चाखावी लागेल, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली होती. मात्र, खुद्द स्मृती इराणी यांचाच या निवडणुकीत पराभव झाला.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपला दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा केला आहे. दिल्लीतील लुटियन्स भागातील 28, तुघलक क्रिसेंट येथे त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. गेल्या 10 वर्षापासून स्मृती इराणी यांचे या बंगल्यात वास्तव्य होते. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने त्या आता लोकसभेच्या सदस्य नाहीत. त्यामुळे शासकीय नियमाप्रमाणे त्यांना त्यांचा बंगला रिकामा करावा लागला. त्यामुळे सोशल मीडियावर स्मृती इराणी या ट्रोल झाल्या होत्या.

स्मृती इराणी यांच्यावर होत असलेल्या या टीकेवरून राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी स्मृती इराणी यांची बाजू घेतली आहे. राहुल यांनी स्मृती यांच्या ॲम्पनवर लिहिले आहे की, राजकारणात जय, पराजय होत असतो. पण, एखाद्याचा अपमान करणे हे दुर्बलांचे लक्षण आहे. राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर हे ट्विट इंग्रजीत केले आहे. लोकांना तुच्छ लेखणे आणि अपमान करणे हे शक्तीचे नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा होत आहे. तर, सोशल मीडियावर लोकही त्यांना भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.