चंद्रकांत पाटलांनी माघार घ्यावी, ब्राह्मण महासंघाच्या 3 अटी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी अजूनही सुरुच आहेत.
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी अजूनही सुरुच आहेत. भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा बंड शमला असला तरी ब्राह्मण महासंघांचा चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला विरोध (Brahman Mahasangh Oppose Chandrakant Patil) कायम आहे. ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांनी चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच ब्राह्मण समाजाच्यावतीने 3 अटीही (Conditions of Brahman Mahasangh) ठेवल्या आहेत.
ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटलांच्या विरोधात मयुरेश अरगडे यांना आपला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांकडून ब्राह्मण महासंघाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलण्यास सुरुवातही केली आहे. ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटलांपुढे 3 मुख्य अटी ठेवल्या आहेत.
1. परशुराम विकास महामंडळ तयार करावे 2. पौराहित्य करणाऱ्या पुरोहितांना मानधन दिले जावे 3. ब्राह्मण समाजाला अॅट्रोसिटी करण्याची परवानगी द्यावी
ब्राह्मण महासंघाच्या या मागण्यांवर चंद्रकांत पाटलांनी सावध भूमिका घेतली आहे. निवडणूक झाल्यानंतर ब्राह्मण महासंघाच्या या मागण्यांवर विचार केला जाईल, असं आश्वासन चंद्रकांत पाटलांनी दिलं आहे. यानंतर ब्राह्मण महासंघ रविवारी (6 ऑक्टोबर) दुपारपर्यंत यावर निर्णय घेणार आहे.
विशेष म्हणजे चंद्रकांत पाटलांच्या मुद्द्यावर आता ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्येही एक वाक्यता नसल्याचं दिसत आहे. एकिकडे महासंघाचे अध्यक्ष चंद्रकात पाटलांनीच माघार घेण्याची भूमिका घेत आहेत. दुसरीकडे ब्राह्मण महासंघाचे इचक पदाधिकारी चंद्रकांत पाटलांच्या माघारीच्या आवाहनावर सारवासारव करत आहेत. यावरुन ब्राह्मण महासंघातही गट पडल्याचं दिसत आहे. त्यामुळे याबाबत ब्राह्मण महासंघाची काय भूमिका असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.