देशभरात NRC लागू होणार की नाही? गृह मंत्रालयाचं लोकसभेत मोठं उत्तर
देशभरात राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा (NRC) लागू होणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय गृहमंत्रालयाने लिखित स्वरुपात लोकसभेत दिलं.
नवी दिल्ली : देशभरात राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा (NRC) लागू होणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय गृह मंत्रालयाने लिखित स्वरुपात (written reply about NRC) लोकसभेत दिलं. देशभरात NRC कायदा लागू करण्याचा निर्णय सरकारने अजून तरी घेतलेला नाही, असं गृह मंत्रालयाकडून स्पष्ट (written reply about NRC) करण्यात आलं आहे. विरोधकांकडून सातत्याने याबाबत प्रश्न विचारुन मोदी सरकारला घेरलं जात होतं. आता सरकारने हे स्पष्टीकरण दिल्याने, वाद काहीसा शमण्याची चिन्हं आहेत.
लोकसभा खासदार चंदन सिंह, नागेश्वर राव यांनी गृहमंत्रालयाला काही प्रश्न विचारले होते. सरकार NRC कायदा लागू करण्याबाबत पावलं उचलत आहे का? राज्य सरकारांशी याबाबत चर्चा केली आहे का? यासह 5 प्रश्न विचारले होते.
या प्रश्नांच्या उत्तरात केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लिखित स्पष्टीकरण दिलं. “आतापर्यंत भारत सरकारने संपूर्ण देशभरात NRC कायदा लागू करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही”
MoS Home Nityanand Rai in a written reply to a question in Lok Sabha: Till now, the government has not taken any decision to prepare National Register of Indian Citizens (NRIC) at the national level. pic.twitter.com/e3OarkJv9x
— ANI (@ANI) February 4, 2020
लोकसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा निवेदन देणार होते. मात्र विरोधकांनी गदारोळ केल्याने ते निवेदन देऊ शकले नाहीत.
CAA आणि NRC वरुन गदारोळ
दरम्यान, देशभरात सुधारित नागरिकता कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकता कायदा (NRC) यांच्यावरुन रान उठलं आहे. गल्लीपासून-दिल्लीपर्यंत या कायद्याविरोधात आंदोलनं होत आहेत. अनेक राज्यांनी हे कायदे लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये धुसफूस आहे.