नवी दिल्ली- आगामी काळातील राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP)दिशा निश्चित करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्लीत पार पडले. या राष्ट्रीय अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राष्ट्रवादीचे बडे नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. या अधिवेशनात पक्षाची पुढची भूमिका काय असेल हे स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची घोषणा या अधिवेशनात करण्यात आली. भविष्यात महत्त्वाच्या भूमिका पार पाडायच्या आहेत, असे संकेत या अधिवेशनात देण्यात आले. शरद पवार हे कधीच पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत, पक्ष जरी छोटा असला तरी आमच नेतृत्व मोठं आहे, असं या अधिवेशनात प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel)यांनी स्पष्ट केले आहे. या अधिवेशनाला सात हजार कार्यकर्त्यांची राज्यभरातून उपस्थिती होती. या अधिवेशनाच्या समारोपावेळी शरद पवार यांनी पक्षाला पुढच्या काळात चार ते पाच महत्त्वाची कामे हातात घेण्याची घोषणा केली.
राष्ट्रीय अधिवेशन संपून राज्यात गेल्यावर ४ ते ५ कार्यक्रम हाती घेण्यात यावेत, अशा सूचना शरद पवार यांनी यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांना दिल्या.
सुप्रिया सुळे यांनी भाषण करताना, यावेळी पक्षातील नेत्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या- राष्ट्रवादी भले ही छोटी पार्टी असेल पण लोकसभा आणि राज्यसभेच्या 800 खासदारांमध्ये टाँप परफॉर्मर खासदारांमध्ये चार राष्ट्रवादीचे आहेत, असे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळेंकडून अमोल कोल्हे, फौजिया खान, वंदना चव्हाण यांच्या कामगिरीचं जाहीर कौतुक करण्यात आले. सुप्रिया सुळेंच्या भाषणात राष्ट्रवादीच्या प्रशासकीय कौशल्याचं कौतुक करताना अजित पवारांचे नाव आले, त्यानंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष करण्यात आला. टाळ्या इतक्या वाजत होत्या की सुप्रिया सुळेंना थोडावेळ भाषण थांबवावं लागलं.