CM vs Shiv Sena: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या फैसला?; चार याचिकांवर होणार सुनावणी
CM vs Shiv Sena : सर्वोच्च न्यायालयात एकूण चार याचिकांवर सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवरही उद्याच सुनावणी होणार आहे. त्यातच शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोगाला घेऊ द्या.
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) फैसला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेसह एकूण चार याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय राज्यातील सत्ता संघर्षावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच्या सुनावणीवर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. आमदारांना अपात्र ठरवल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार कोसळू शकतं, असं जाणकार सांगतात. तर सरकारच्या बाजूने निकाल आल्यास येत्या चार दिवसात राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्याचा कौल कुणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या शिवाय कोर्टाकडून येणारा निकाल हा ऐतिहासिक ठरणार आहे. या निकालावर शिवसेनेचं (shivsena) अस्तित्वही अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात एकूण चार याचिकांवर सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवरही उद्याच सुनावणी होणार आहे. त्यातच शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोगाला घेऊ द्या, असं शिंदे गटाने याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्ट घटनापीठाची स्थापना करणार का? की कोर्ट काही आदेश देणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. उद्याच्या सुनावणीवर शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य ठरणार आहे.
परिस्थिती जैसे थे ठेवा
या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हेमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे. 20 जुलैपासून शिवसेनेने आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या चार याचिकांवर सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरवू नका, जैसे थे परिस्थिती ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.
चार याचिका कोणत्या?
1. एकून 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान
2 . राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान
3. शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप
4. एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप
या आमदारांवर कारवाईची मागणी
>> एकनाथ शिंदे >> अब्दुल सत्तार >> तानाजी सामंत >> यामिनी जाधव >> संदिपान भुमरे >> भरत गोगावले >> संजय शिरसाट >> लता सोनावणे >> प्रकाश सुर्वे >> बालाजी किणीकर >> बालाजी कल्याणकर >> अनिल बाबर >> महेश शिंदे >> संजय रायमुलकर >> रमेश बोरनारे >> चिमणराव पाटील