मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी 1000 कोटींचा सट्टा, कुणाला किती भाव?
पुणे : एक्झिट पोल येण्याच्या अगोदरपासूनच महाराष्ट्रात 7000 कोटींचा सट्टा लागलाय. यामध्ये सर्वाधिक बोली लागलीय ती मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी. या दोन्ही मतदारसंघांसाठी अंदाजे एक हजार कोटी रुपयांचा सट्टा लागल्याचं बोललं जातंय. मावळ आणि शिरुरमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे सट्टेबाजारातही हे दोन मतदारसंघ तेजीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मावळमधून मुलगा पार्थ […]
पुणे : एक्झिट पोल येण्याच्या अगोदरपासूनच महाराष्ट्रात 7000 कोटींचा सट्टा लागलाय. यामध्ये सर्वाधिक बोली लागलीय ती मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी. या दोन्ही मतदारसंघांसाठी अंदाजे एक हजार कोटी रुपयांचा सट्टा लागल्याचं बोललं जातंय. मावळ आणि शिरुरमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे सट्टेबाजारातही हे दोन मतदारसंघ तेजीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मावळमधून मुलगा पार्थ पवारला निवडणुकीत उतरवलंय. त्यामुळे इथे पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्याविरुद्ध शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं आव्हान आहे. या मतदारसंघात सट्टेबाजारात दोन्ही उमेदवारांवर 90 पैशांचा भाव आहे. त्यामुळे काँटे की टक्कर होणार असल्याचं चित्र दिसत आहे.
शिरुर मतदारसंघातही राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत आहे. पण सट्टेबाजाराकडे पाहिलं तर या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटलांना पसंती दिली जात आहे. आढळराव पाटलांना 50 पैसे भाव दिला जातोय, तर अमोल कोल्हे यांच्यावर 1.80 रुपयांचा भाव आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता विविध एक्झिट पोलने वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. पण सट्टेबाजाराचा अंदाजही काही प्रमाणात एक्झिट पोलशी मिळता जुळता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात युतीच्या 32 पेक्षा कमी जागा येणार नाहीत, असा दावा सट्टेबाजारात केला जातोय. यासाठी एक रुपयाचा भाव आहे.
आयपीएलवरही अवैध पद्धतीने मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. पण त्यापेक्षाही जास्त सट्टा महाराष्ट्रात लागलाय. त्यात विशेष म्हणजे फक्त शिरुर आणि मावळ मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मावळमध्ये पार्थ पवार यांचा पराभव हा पवार कुटुंबाचा पराभव असेल. त्यामुळे सट्टेबाजारातही या मतदारसंघाला महत्त्व प्राप्त झालंय.