Kolhapur : कोल्हापूरचं आणखी एक पाऊल पुढे! तृतीयपंथीयाला दिला स्वीकृत नगरसेवकपदाचा मान
विशेष सभेमध्ये आज तातोबा हांडे उर्फ देव आई यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर तातोबा हांडे यांनी आनंद व्यक्त केला असून यापुढे तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी लढा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या हुपरी नगरपालिकेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक म्हणून तृतीयपंथीयाला (Triyapanthi) संधी देण्यात आली आहे. ताराराणी पक्षाकडून तातोबा हांडे उर्फ देव आई यांना हा स्वीकृत नगरसेवकपदाचा मान देण्यात आला आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून तृतीयपंथीयाला संधी देण्याची महाराष्ट्रातील कदाचित ही पहिलीच घटना आहे.. त्यामुळेच त्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी ग्रामपंचायतीमध्ये (Hupari grampanchayat) रुपांतरीत झाले आहे. यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत भाजपा आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाने एकत्रित सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपाकडून कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. त्यापैकी ताराराणी (Tararani) पक्षाने तातोबा हांडे उर्फ देव आई यांनाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिलीय.
‘दृष्टिकोन बदलेल’
विशेष सभेमध्ये आज त्यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर तातोबा हांडे यांनी आनंद व्यक्त केला असून यापुढे तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी लढा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निवडीनंतर तातोबा हांडे यांच्या सहकाऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले. तृतीयपंथीयांना समाजात चांगली वागणूक मिळत नाही. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही फारसा चांगला नसतो. यांच्या निवडीनंतर तरी हा दृष्टिकोन बदलेल, अशी अपेक्षा हांडे यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
ऐतिहासिक निर्णय
हांडे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचा निर्णय ताराराणी पक्षाचे आमदार प्रकाश आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी घेतला. त्यामुळेच आज हा ऐतिहासिक निर्णय होऊ शकला. निवडीनंतर राहुल आवडे यांनी ही तातोबा हांडे यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा केली आहे. कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी म्हणून ओळखला जातो. विधवा प्रथा बंदीचा निर्णय काही महिन्यापूर्वीच जिल्ह्याने घेतला. त्यानंतर आता तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देत जिल्ह्यांने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. हुपरीनंतर आता जिल्ह्यात आणि राज्यातही आता या निर्णयाचे अनुकरण करण्याची गरज व्यक्त होते आहे.