TS Sinhadev resigns : टीएस सिंगदेव यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, छत्तीसगड सरकारमध्ये खळबळ, काँग्रेसमध्ये पुन्हा बंड?
मंत्री टीएस सिंहदेव यांना विश्वासात न घेता त्यांच्या विभागाशी संबंधित निर्णय घेतले जात होते, त्यामुळे रागाच्या भरात टीएस सिंहदेव यांनी राजीनामा दिला आहे.
छत्तीसगड : महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलं. तर दुसरीकडे गोवा काँग्रेसमध्ये (Goa Congress) अशाच प्रकारचं बंड होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र अद्याप तरी तसं झालेलं नाही. मात्र काँग्रेसची हीच डोकेदुखी संपायचं नाव घेत नाहीये. छत्तीसगडमध्ये ही काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या बातम्या समोर येऊ लागलेत. टी. एस सिंह (T S Singh) यांनी आपल्या ग्रामविकास मंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला आहे. त्यामुळे या ठिकाणीही ऑपरेशन लोटस सुरू आहे का? असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भूपेश बघेल मंत्रिमंडळात खळबळ उडाली आहे. छत्तीसगडच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला आहे. मंत्री टीएस सिंहदेव यांना विश्वासात न घेता त्यांच्या विभागाशी संबंधित निर्णय घेतले जात होते, त्यामुळे रागाच्या भरात टीएस सिंहदेव यांनी राजीनामा दिला आहे.
हस्तक्षेपामुळे संतप्त
त्रिभुवनेश्वर शरण सिंगदेव हे पंचायत आणि ग्रामीण विकास, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, वीस कलमी कार्यक्रम, व्यावसायिक कर (जीएसटी) या खात्यांचे प्रभारी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री सिंगदेव यांनी पंचायत आणि ग्रामविकास खात्याचा राजीनामा दिला आहे. यापूर्वीही मोठ्या प्रमाणात सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांवर (एपीओ) कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते, त्यानंतर पंचायत मंत्री सिंहदेव संतप्त झाले होते.
मंत्र्यालाच विश्वासात घेतले नाही
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे 10,000 मनरेगा कामगार त्यांच्या दोन कलमी मागण्यांसाठी राजधानीत 60 दिवसांपेक्षा जास्त काळ संपावर होते. राज्य सरकारने सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्यावर कारवाई केली होती. 21 सहाय्यक प्रकल्प अधिकार्यांना निलंबित करण्यापूर्वी त्यांना विचारलेही नाही. काही दिवसांपूर्वीच सर्व अधिकारी पुन्हा रुजू झाले. त्याबाबतही त्यांना विचारले गेले नाही.
भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा
काही दिवसांपूर्वी मंत्री टीएस सिंहदेव आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यातील मुख्यमंत्रिपदासाठीच्या लढतीला उधाण आले होते. त्यामुळे दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले होते. आता टीएस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी अटकळही होती. मात्र टीएस सिंगदेव यांनी स्वत: मीडियासमोर येऊन आपण कधीही काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगितले आहे. खरं तरटीएस सिंगदेव यांनी 14 जुलै रोजी सुरगुजाला भेट दिली तेव्हा ते मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. आणि आज तेच खरं ठरलं आहे.