संभावित आघाडीत बिघाडी, केजरीवाल आणि राहुल गांधी ट्विटरवरच भिडले
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ट्विटरवरच भिडले. आप आणि काँग्रेसच्या संभावित आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. अरविंद केजरीवालांनी यू टर्न घेतल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय, तर याला रिप्लाय करत केजरीवालांनी काँग्रेसच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करत असल्याचा पलटवार केलाय. राहुल गांधी काय म्हणाले? दिल्लीत विधानसभेच्या 70 आणि लोकसभेच्या […]
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ट्विटरवरच भिडले. आप आणि काँग्रेसच्या संभावित आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. अरविंद केजरीवालांनी यू टर्न घेतल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय, तर याला रिप्लाय करत केजरीवालांनी काँग्रेसच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करत असल्याचा पलटवार केलाय.
राहुल गांधी काय म्हणाले?
दिल्लीत विधानसभेच्या 70 आणि लोकसभेच्या सात जागा आहेत. विधानसभेत आप 67 जागांसह सर्वात मोठा आणि सत्ताधारी पक्ष आहे. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व सातही जागा जिंकल्या होत्या. यावेळी इथे भाजपला रोखण्यासाठी आपने काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला होता. “दिल्लीत काँग्रेस आणि आपची आघाडी म्हणजे भाजपचा पराभव आहे. यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेसने आपला चार जागांची ऑफर दिली होती. पण केजरीवाल यांनी आणखी एक यू टर्न घेतलाय. आमचे दरवाजे अजूनही उघडे आहेत, पण वेळ निघून चालली आहे,” असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलंय. ‘अब AAP की बारी’ या हॅश टॅगसह राहुल गांधींनी ट्वीट केलंय.
केजरीवाल यांचा पलटवार
यू टर्न घेतल्याचा आरोप केल्यानंतर केजरीवाल यांनीही उत्तर दिलंय. “कोणता यू-टर्न? आत्ता कुठे चर्चा सुरु झाली होती. तुमचं ट्वीट हे दाखवतं की तुम्हाला आघाडी करायची नाही, केवळ देखावा करायचाय. तुमच्या या वक्तव्यांचं मला वाईट वाटतंय. आज देशाला मोदी-शाह यांच्या धोक्यापासून वाचवणं गरजेचं आहे. दुर्दैवाने तुम्ही उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातही मोदीविरोधी मतांचं विभाजन करुन मोदींची मदत करत आहात,” असं उत्तर केजरीवालांनी दिलं.
भाजपला रोखण्यासाठी दिल्लीत काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडीची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. विरोधकांनी एकत्र यावं म्हणणारे राहुल गांधी आणि केजरीवालांमध्येच जागावाटपावरुन जाहीर वाद सुरु झालाय. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचंही बोललं जात होतं. पण केजरीवालांनी खरंच यू टर्न घेतला का, याबाबत आता राहुल गांधींच्या ट्वीटवरुन चर्चा सुरु झाली आहे.
दिल्लीमध्ये सहाव्या टप्प्यात 12 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 16 एप्रिलपासून सुरु होईल. 23 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. आप आणि काँग्रेसच्या संभावित आघाडीमुळे भाजपनेही दिल्लीतला एकही उमेदवार अजून जाहीर केलेला नाही. भाजपने सस्पेन्स कायम ठेवल्यामुळे केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यातच जाहीरपणे खडाजंगी सुरु झाली आहे.