दोन लाख लोकांची व्यवस्था, नांदेडमध्ये मोदींच्या सभेत तीन मतदारसंघ कव्हर करण्याचा प्रयत्न
नांदेड : काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात आज नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. मोदी लाटेतही काँग्रेसचे 2014 चे उमेदवार अशोक चव्हाण यांनी मोठ्या फरकाने ही जागा कायम ठेवली होती. पण आता अशोक चव्हाण यांचे कट्टर राजकीय विरोधक प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आव्हान दिल्यामुळे या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या […]
नांदेड : काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात आज नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. मोदी लाटेतही काँग्रेसचे 2014 चे उमेदवार अशोक चव्हाण यांनी मोठ्या फरकाने ही जागा कायम ठेवली होती. पण आता अशोक चव्हाण यांचे कट्टर राजकीय विरोधक प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आव्हान दिल्यामुळे या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना फायदा किती आणि अशोक चव्हाण यांना तोटा किती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नांदेड इथे होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे तीन लोकसभा मतदार संघाला फायदा होईल असं सांगितलं जात आहे. त्यात एक नांदेड, दुसरा परभणी, तर तिसरा हिंगोली मतदारसंघ आहे. नांदेड मतदारसंघात भाजपचा उमेदवार आहे. तर हिंगोली आणि परभणी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत.
परभणी मतदारसंघ
परभणीत बंडू जाधव यांच्या विरोधात असलेली नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश विटेकर हा दिलेला नवा चेहरा पाहता या मतदारसंघात या वेळी भाकरी फिरण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या मतदारसंघावर नरेंद्र मोदी यांच्या सभेचा परिणाम होईल का असा प्रश्न आहे.
हिंगोली मतदारसंघ
हिंगोली ही काँग्रेसची रनिंग सीट आहे. पण या मतदारसंघातले खासदार राजीव सातव यांनी माघार घेतली. तर शिवसेनेचे आयात उमेदवार सुभाष वानखेडे हे काँग्रेसकडून लढत आहेत. तर त्यांच्यासमोर नांदेडहून आयात केलेले शिवसेनेचे हेमंत पाटील यांचं आव्हान आहे. पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या हेमंत पाटील यांना नरेंद्र मोदी यांच्या सभेचा फायदा होईल का असा प्रश्न आहे.
नांदेड मतदारसंघ
खुद्द नांदेड मतदारसंघ हा काँग्रेसचा गड आहे. पण 2004 साली भाजपने या गडाला खिंडार पाडत डीबी पाटील यांच्या रूपाने भाजपचा पहिला खासदार दिला होता. भाजपला प्रतापराव पाटील यांच्या रूपाने पुन्हा एकदा चमत्कार होण्याची अपेक्षा आहे. यासाठी नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. मोदी यांच्या सभेमुळे नांदेड लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती बदलते का हे पाहणं महत्वाचं आहे.
सभेला दोन लाख लोक बसण्याची व्यवस्था
ही सभा नांदेड शहरापासून जवळ असलेल्या कवठा या परिसरात होत आहे. या सभेत जवळपास दोन लाख लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मंचावर वातानुकूलित व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड, परभणी हिंगोली आणि लातूर मतदारसंघातून नागरिक या सभेसाठी येण्याची शक्यता आहे. कवठा परिसरातील शेतात सपाटीकरण करून या सभेसाठी मैदान तयार करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी 10 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर मतदारसंघांचा समावेश आहे.