समाजवादी पार्टी भाजपची बी टीम, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप, महाविकास आघाडीत मोठी बिघाडी?
"आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीत राहू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार बाबरी मशीद बद्दल वक्तव्य होत आहेत. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असे अबू आझमी यांनी म्हटले होते.
Aaditya Thackeray criticizes Abu Azmi : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजप हा मोठा पक्ष ठरला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. सध्या राज्यात तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरु आहे. आज आणि काल असे दोन दिवस अनेक आमदारांचा शपथविधी पार पडला. त्यातच आता आणखी एक मोठा धक्का महाविकासआघाडीला बसला आहे. महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेता आहे. आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर जोरदार निशाणा साधला आहे.
विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सपा आमदार अबू आझमी यांच्याबद्दल प्रशअन विचारण्यात आला. त्यावर त्यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. “सध्या समाजवादी पार्टी ही भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे. मला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचे नाही”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
“भाजपाची बी टीम म्हणून वागायचे का?”
“अखिलेश यादव हे उत्तरप्रदेशात जी समाजवादी पार्टी चालवत आहेत, ती अत्यंत वेगळी आहे. तिथे ते इंडिया आघाडीचे नेतृत्व करत आहेत. पण महाराष्ट्रात त्यांचे जे लोक आहेत, त्यांना मी विधानसभेत पाहिले आहे. यावेळी निवडणुकीत ते भाजपची बी टीम म्हणून काम करत होते. मला त्यांच्यावर फार काही बोलायचे नाही. कारण कोणत्या विषयाला किती खेचून न्यायचे. भाजपाची बी टीम म्हणून वागायचे का? हा एक प्रश्न तर आहेच. पण मला हा विषय लांबवायचा नसून आमची हिंदुत्वाच्या बाबतची भूमिका स्पष्ट आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
“इंडिया आघाडी संविधानासाठी लढतोय”
“महाविकासआघाडीतील ए किंवा बी, टीमने आम्हाला शिकवू नये. हिंदू, मुस्लिम सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन पुढे चाललो आहोत. इंडिया आघाडी संविधानासाठी लढतोय. आम्ही जनतेच्या आवाजासाठी लढतोय. ममता बॅनर्जी आमच्या जवळच्या आहेत, इंडिया आघाडीतील इतर नेतेही आमच्या जवळचे आहेत. समाजवादीचे उत्तर प्रदेशातील नेतृत्व खूप चांगलं काम करत आहे. मात्र आपल्याकडे ज्यांनी ट्विट केलं, अबू आझमी भाजपच्या बी टीमसारखं काम करतात”, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
…म्हणून समाजवादी पार्टी मविआतून बाहेर
दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची सर्वधर्म समभावाची भूमिका असल्याने आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीत राहू शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार बाबरी मशीद बद्दल वक्तव्य होत आहेत. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असे अबू आझमी यांनी म्हटले होते.