Uday Samant : मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी हा कामाचाच भाग, उदय सामंतांचं स्पष्टीकरण; आदित्य ठाकरे, अजित पवारांना लगावला टोला
मंत्रिमंडळाचा विस्तार न्यायालयीन बाबीमुळे थांबलेला नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मंत्रिमंडळ विस्तार जरी थांबला असला, तरी लोकांची कामे कुठेही थांबलेली नाहीत, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी : मंत्रिमंडळ विस्तार हा दोन ते तीन दिवसांमध्ये होईल, अशी माहिती शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाली आपल्या निवासस्थानी सध्या उदय सामंत आहेत. त्यावेळी त्यांनी टीव्ही 9 सोबत संवाद साधला. सचिवांच्या हाती कारभार दिला याचा अर्थ केवळ काही कामे रखडू नयेत, हा त्यामागील उद्देश आहे. विरोधकांनी टीका करणे लोकशाहीचा (Democracy) भाग आहे, अशी प्रतिक्रियादेखील सामंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी हा एक कामाचाच भाग असतो. यापूर्वी देखील राज्यातल्या कामांसाठी दिल्लीवारी करण्यात आलेली आहे, असे सांगत सामंत यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना उत्तर दिले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न्यायालयीन बाबीमुळे थांबलेला नाही, असे ते म्हणाले.
‘केसरकर-राणे वाद मनोरंजन’
फ्रेंडशिप डेला शहाजी बापू यांनी शिंदे आणि ठाकरे एकत्र यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. शहाजी बापू यांचे म्हणणे खरे आहे, असे सांगत शहाजी बापूंच्या विधानाला उदय सामंत यांच्या विधानाला पाठिंबा दिला आहे. दीपक केसरकर आणि राणे हा वाद केवळ मनोरंजन म्हणून घ्यावा, असे विधानदेखील उदय सामंत यांनी दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे यांच्यामध्ये रंगलेल्या वाक् युद्धावर केले आहे. दोन्हीकडून सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
‘न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास’
मंत्रिमंडळाचा विस्तार न्यायालयीन बाबीमुळे थांबलेला नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मंत्रिमंडळ विस्तार जरी थांबला असला, तरी लोकांची कामे कुठेही थांबलेली नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले आहे. त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार झालेला पाहायला मिळेल, असे ते म्हणाले.
काय म्हणाले उदय सामंत?
अजित पवारांना टोला
अजित पवार यांच्यासाठी आता आम्ही मंत्रिमंडळ विस्तार लवकर लवकर, असे बोलणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. मंत्रिमंडळ विस्तार काही कालावधीत असे आमच्याकडून सांगितले जाईल. मंत्रिमंडळ विस्तारावरती टीका करणाऱ्या अजित पवार यांना आमदार उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पुण्यात ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी माझा सत्कार आयोजित केला आहे. हल्ला झाला त्या ठिकाणी जरी मी आलो, तरी प्रतिहल्ला करण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.