एकनाथ शिंदे मुख्यंत्रीपदाचा राजीनामा देणार? अजितदादा मुख्यमंत्री होणार?; महाराष्ट्राला पडलेल्या दोन प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात
मुख्यमंत्री राजीनामा देणार हे पेरलं जात आहे. निगेटिव्हीटी पसरवली जात आहे. पण त्यात काही तथ्य नाही. भरत गोगावले यांनी दिलेलं भाकरीचं उदाहरण योग्य आहे. भाकरीत वाटेकरी झाल्याने एकदोन मंत्रीपदे इकडे तिकडे होतील.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलून गेले आहेत. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या राजकीय चर्चा जोरात सुरू असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या सर्व चर्चांवर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे.
उदय सामंत यांनी मीडियाशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका नाही. अजित पवार मुख्यमंत्री होणार ही अफवा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात इतरांचा समावेश होणार आहे. खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतील, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
पुन्हा माघार नाही
शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 11 महिन्यापूर्वी आम्ही मंत्री झालो. 12 महिन्यापूर्वी उठाव केला. तो कोणत्या पक्षातून झाला हे सर्वांना माहीत आहे. ज्या पक्षाविरोधात उठाव केला तिथे परत जाण्याचा प्रश्नच येत नाही. किंवा त्यांनी आमच्याकडे येण्याचा प्रश्न नाही. 200पेक्षा अधिक आमदार देऊन युती स्थिर सरकार देणार असेल, शिंदे यांच्याच नेृत्वात निवडणुका होत असतील तर आम्हाला कुणाचीही गरज नाही, असं उदय सामंत यांनी ठणकावून सांगितलं.
त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाही
राजकारण करताना टीका सुरू होती, शिवीगाळ सुरू होती आणि वैयक्तिक बदनामी सुरू होती. एकनाथ शिंदे आणि आमच्यावर वैयक्तिक टीका केली जात होती. दोन महिन्याने सरकार पडणार, तीन महिन्याने सरकार पडणार अशी तारीख डिक्लेअर केली जात होती. सरकार काही पडलं नाही. अजित पवार आमच्या युतीत सामील झाले. ते आल्यावर ते मुख्यमंत्री होणार… शिंदे राजीनामा देणार… हे जे कोणी पिकवतंय त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणुका
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात निवडणुका होतील हे स्पष्ट केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तेच सांगितलं. मुख्यमंत्रीपदाला धोका असल्याचं सांगून नकारात्मक गोष्टी पसरवल्या जात आहेत. जे घडलंच नाही. ते घडलं म्हणून क्रिएट करणं योग्य नाही. हा लोकशाहीतील घाणेरडा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
त्यांचेच आमदार संपर्कात
ठाकरे गटाच्या 13 पैकी 6 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यातील तीन चार आमच्या आमदारांनी मला फोन केला. मुंबईऐवजी इतर राज्यात भेटू असं त्यांनी सांगितलं. चर्चा होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळे विनायक राऊत यांनी सांगितलेला आकडा त्यांच्याबाबतीतील खरा आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.