शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणतात, उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ विधानाशी मीही सहमत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल वीर सावरकर स्मारकात कार्यक्रम झाला. सावरकर ते बाळासाहेब असा त्या कार्यक्रमाचा विषय होता. जो पक्ष सावरकरांबाबत हिन दर्जाची वक्तव्य करतो.
मुंबई: शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटातून विस्तवही जात नाही. दोन्ही गटाचे नेते संधी मिळताच एकमेकांवर तोंडसुख घेत असतात. मात्र, आज पहिल्यांदाच शिंदे गटाच्याच मंत्र्याने थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या एका विधानाचं समर्थन केलं आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा बाजार मांडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाशी उदय सामंत यांनी सहमती दर्शवली आहे. बाळासाहेबांच्या नावाने बाजार करू नये या मतांशी मी ही सहमत आहे, असं सांगतानाच मात्र तीन दिवसांपूर्वी जी वक्तव्य सावरकरांबाबत केली गेली. त्याबाबतचे मत ही आम्हाला कळायला हवे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल वीर सावरकर स्मारकात कार्यक्रम झाला. सावरकर ते बाळासाहेब असा त्या कार्यक्रमाचा विषय होता. जो पक्ष सावरकरांबाबत हिन दर्जाची वक्तव्य करतो. त्याबाबतही त्यांची भूमिका स्पष्ट असायला हवी, असं ते म्हणाले.
मनी शंकर अय्यर यांच्या विधानांविरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी टोकाची भूमिका घेतली होती. त्याबद्दल आम्हाला आजही अभिमान आहे. बाळसाहेबांचे विचार आता काही जण जुमानत नाहीत. जे आपण भारत जोडोच्या माध्यमातून पाहत असाल. मग नक्की बाजारूपणा कोण करतयं? हे वीर सावरकरांवरील टीकेवरून स्पष्ट झालयं, असा टोलाही त्यांनी लगावला.
पिक्चर अभी बाकी है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने उठाव केला. जुन सरकार पाडलं. त्याविरोधात त्यांचा राग असू शकतो. म्हणूनच शिंदेंवर टीका केली जातेय, असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरे यांना काढला.
संविधान कुठेही धोक्यात नाही. संविधानाला धरूनच पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेत असतात. त्यापलिकडे कोणी निर्णय घेत नाही, असंही ते म्हणाले.