नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत एक प्रश्न उपस्थित केला आहे (Udayanraje Bhosale question Shivsena). आम्ही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील आहोत की नाही हे विचारत दाखले मागणाऱ्यांनी शिकवू नये. त्यांनी आधी बाळासाहेब ठाकरे मोठे की छत्रपती शिवाजी महाराज हे सांगावं, असं मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पुढेही राहणार आहेत. पण माझा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न आहे, की शिवाजी महाराज मोठे आहेत की बाळासाहेब ठाकरे? हा प्रश्न मला सर्वांनाच विचारायचा आहे. शिवसेना भवनावर महाराजांची प्रतिमा वर पाहिजे आणि मग खाली बाळासाहेब ठाकरे यांची पाहिजे. मग यावर कुणीच आजपर्यंत का आक्षेप घेतला नाही? यावर का कुणी विचारणा केली नाही. जर बाळासाहेब ठाकरे शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असतील तर त्यांनी शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करावं. मी हे द्वेषापोटी म्हणत नसून तार्किक मुद्दा मांडत आहे. त्यामुळे माध्यमांनी जसा मला प्रश्न विचारताय तसा त्यांनाही विचारावा.”
“आम्ही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील आहोत की नाही याचे ज्यांनी दाखले मागितले त्यांनी असं बोलणं हास्यास्पद आहे. शिवसेना हा महाराजांच्या नावावर आधारीत पक्ष आहे. मागीलवेळी जितेंद्र आव्हाड आणि इतरांनी वक्तव्ये केली तेव्हा आम्ही शांत बसलो. मात्र, जेव्हा त्यांनी आम्ही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातीलच नाही असं म्हटलं त्यावेळी त्यांनी मला खूप डिवचलं. त्यामुळे मला पत्रकार परिषद घेणं भाग पडलं,” असं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं.
महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही” अशा शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीनंतर काही घडलेच नसल्याचा दावा केला. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याचे काल समोर आले होते. (Udayanraje Bhosale on Jai Bhavani Jai Shivaji Slogans)
सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
संबंधित व्हिडीओ :
Udayanraje Bhosale question Shivsena