कोण हा दादा?; उदयनराजे अजित दादांचं नाव न घेता असं का म्हणाले?
मधल्या काळात सर्वांच्या इच्छेनुसार मनोमिलन केलं. त्यावेळी देखील शिवेंद्रराजे यानी आडवा आडवी केली म्हणूनच हे मनोमिलन तुटले. लोकांचे काम होऊ दिली जात नव्हती. म्हणून हे मनोमिलन तोडायची वेळ आली.
सातारा: भारतामध्ये काही मोजके प्रोजेक्ट आहेत, त्याला युनेस्कोने परवानगी दिली आहे. त्यापैकी साताऱ्याचे कास धरण आहे. शिवेंद्रराजे (shivendra raje bhosale) सांगतात दादांनी परवानगी दिली होती. कोण हा दादा?, असा सवाल छत्रपती उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांचं नाव न घेता केला. शिवेंद्रराजेंच्या जाहीरनाम्यात कास धरणाचा उल्लेख नव्हता. तरी देखील ते श्रेय घेतात. नेहमीप्रमाणे चांगलं झालं की आपण केलं अशी म्हणण्याची त्यांची सवय आहे, असा चिमटा उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना काढला. कन्हेर धरणाची प्रादेशिक पाणी योजना ही अवघ्या 16 कोटीत होणारी योजना असताना देखील खर्चिक शहापूर योजना करून नुकसान करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.
उदयनराजे भोसले मीडियाशी संवाद साधत होते. सातारा नगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आम्हाला यश मिळाल आहे. नगरपालिकेची सध्याची जुनी इमारत कामकाजासाठी अपुरी पडत असल्यामुळे दीड लाख स्क्वेअर फुटाच्या नव्या भव्य इमारतीचे काम सुरू आहे. सातारा जिल्हा परिषदेपेक्षाही ही नगरपालिकेची इमारत मोठी असणार आहे, असं सांगतानाच माझ्यावर रोज भ्रष्टाचाराचे आरोप करतात. आरोप करणाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगली पाहिजे. पुरावे नसताना माझ्यावर आरोप केले जातात, असं उदयनराजे म्हणाले.
आमच्या घराण्यापुढे कोणीही टीकू शकत नाही
निर्विवाद सत्ता असताना देखील त्या काळात त्यांच्याकडून नगरपालिकेची कामे मार्गी लागली नाहीत. त्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला होता. आमच्या घराण्याचं वलय एवढं मोठं आहे की, दुसरा कोणीही यापुढे टिकू शकत नाही. समाजसेवा हेच आमच्या सातारा विकास आघाडीचे ब्रीद वाक्य आहे. नगरसेवक असल्यापासून मी काम करत आहे. त्यावेळी माझ्यावर टीका केली गेली. कास धरणाचं काम देखील आतापर्यंत झालं नव्हतं. मात्र आमच्या काळात ते पूर्ण झालं मात्र आताचे लोकप्रतिनिधी आम्हालाच नाव ठेवतात, असं ते म्हणाले.
मला गैर काही पटत नाही
पहिल्या काळात सातारा शहरात कचऱ्याचे ढीग दिसायचे पण आता हे चित्र बदललं आहे. ड्रेनेजचा विषयी पहिल्यापासून प्रलंबित राहिला. मात्र आता आमच्या माध्यमातून बंदीस्त गटार योजनेतून तो आम्ही पूर्ण केला. माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो मात्र तुम्हालाच माहीत आहे आणि तुम्हीच बातम्या दाखवता, असा टोला त्यांनी लगावला. मला गैर काही पटत नाही आणि मी करत देखील नाही. मी जर असं केलं असतं तर राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वांनी मला असं सोडलं असतं का? असा सवालही त्यांनी केला.
तर कडेलोट पॉईंटवरून उडी मारायची
अजिंक्यताराच्या किल्ल्यावर जाऊन सिद्ध करूया. जो खोटा ठरेल त्याने कडेलोट पॉईंटवरून उडी मारायची. आम्ही जर भ्रष्टाचार केला असता तर एवढी कामे झालीच नसती. पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटर मध्ये पण खूप टीका केली. ते काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन करण्याचा देखील अट्टाहास धरला. शहरातील राजवाडा देखील सुशोभीकरण करण्याचा नियोजन होतं. मात्र त्यातही खोडा घातला. हे जर व्यवस्थित नियोजन झालं असतं तर नगरपालिकेला उत्पन्न मिळालं असतं, असं ते म्हणाले.
50 नगरसेवक निवडून आणणार
मधल्या काळात सर्वांच्या इच्छेनुसार मनोमिलन केलं. त्यावेळी देखील शिवेंद्रराजे यानी आडवा आडवी केली म्हणूनच हे मनोमिलन तुटले. लोकांचे काम होऊ दिली जात नव्हती. म्हणून हे मनोमिलन तोडायची वेळ आली. यावेळच्या सातारा नगरपालिका निवडणुकीत सातारा विकास आघाडीचे सर्व 50 नगरसेवक निवडून आणणार. नगर विकास आघाडीची एकही सीट निवडून येणार नाही. लोक यांना स्वीकारणार नाहीत, असं सांगतानाच मिशीला पीळ मारून उपयोग नसतो. त्यासाठी थोडं साताऱ्यातून फिरावं लागतं. माझी सुरुवात नगरसेवकापासून आहे. म्हणूनच मागील वेळेस सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो. हे मोठे उदाहरण आहे, असं ते म्हणाले.
त्यावेळेस बघू
वरिष्ठांनी जर आदेश दिले तर दोघे एकत्र लढणार का? या प्रश्नावर उदयनराजेंनी ते त्यावेळेस बघू, असं उत्तर दिलं. माजी जिल्हाधिकाऱ्यांनी आता राहत असलेला बंगला लवकर सोडावा आताच्या विद्यमान जिल्हाधिकारी रूचेस जयवंशी यांना सर्किट हाऊसमध्ये राहायची वेळ आलीय, अशी हातजोडून विनंतीही त्यांनी केली.