मेलो असतो तर बरं झालं असतं… भर पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर
शिवाजी महाराजांचा असा अपमान आपल्याला सहन करायचा असेल तर मोठ्या-मोठ्या स्थळांना, ठिकाणांना त्यांचं नाव देण्याची गरज काय? हे बेगडी प्रेम कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.
साताराः छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) असा अपमान सहन करण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी आगतिकता खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केली. साताऱ्यात (Satara) आज त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या तीव्र भावना व्यक्त केल्या. राज्यात, देशात आज ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे.
परदेशातून लोक येतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचं नाव त्यांच्या कानावर पडतं. पण शिवाजी महाराजांचा असा अपमान आपल्याला सहन करायचा असेल तर मोठ्या-मोठ्या स्थळांना, ठिकाणांना त्यांचं नाव देण्याची गरज काय? हे बेगडी प्रेम कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ उदयनराजे भोसले यांनी याआधीही आक्रमक भूमिका घेतली होती. आज त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचा निषेध केला. ते म्हणाले, त्याकाळात शिवाजी महाराजांनी समाजाचा विचार केला. आज सर्व व्यक्तिकेंद्रीत झाले आहेत. कोणीच अपवाद नाही. राष्ट्रीय पक्ष असो की प्रादेशिक पक्ष. असंच चालत राहीलं तर कितपत चालणार. या देशाचे तुकडे व्हायला किती वेळ लागणार?
भारत महासत्तेकडे गेला पाहिजे असं आपण म्हणतो. पण हे असंच राहिलं तर देशाचे छोटे छोटे तुकडे होतील. हे देशाच्या अखंडतेला घातक आहे. या लोकांना कधी कळणार. ही नाटकं तरी करता. नका ठेवू शिवाजी महाराजांचा फोटो. त्यांचं नावच पुसून टाकू ना. विमानतळाला तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव देता. देश परदेशातून लोक येतात तेव्हा त्यांच्या कानावर शिवाजी महाराजांचं नाव पडतं. कशाला पाहिजे, जाऊ द्याना कशाला हवं बेगडी प्रेम. रेल्वे टर्मिनसला तरी का नाव द्यायचं. शिवजयंती तरी करा साजरी करायची?
हे बोलताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. त्यांनी तोंडाला रुमाल लावला. कंठ दाटला. मेलो असतो तर बरं झालं असतं. अशा व्यक्तीविरोधात कारवाई करत नसाल तर कुणालाही शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. मीही वेडंवाकडं वागलो तर मलाही नाव घ्यायचा अधिकार नाही, असं उदयनराजे भोसले म्हणाले.