दाऊदला हादरवणारा बीएमसीचा ‘डॅशिंग’ माजी अधिकारी काँग्रेसला झुंजवणार
महापालिकेच्या बी विभाग कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले उदयकुमार शिरुरकर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत
मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या साम्राज्याला हादरवून सोडणारे मुंबई महापालिकेचे निवृत्त अधिकारी उदयकुमार शिरुरकर (Udaykumar Shirurkar in Mumbadevi Constituency) विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. निवृत्त सहाय्यक आयुक्त शिरुरकर मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमिन पटेल यांना भिडणार आहेत.
महापालिकेच्या बी विभाग कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले उदयकुमार शिरुरकर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे दोन वेळ आमदार अमिन पटेल आणि महायुतीचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांना ते आव्हान देणार आहेत.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमिन पटेल दोन टर्म निवडून आलेले आहेत. हॅट्ट्रिक साधण्याचा पटेलांचा निर्धार आहे. परंतु उदयकुमार शिरुरकरही जिंकण्याच्या इर्षेने मैदानात उतरले आहेत.
कोण आहेत उदयकुमार शिरुरकर?
महापालिकेच्या बी वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त म्हणून काम करताना उदयकुमार शिरुरकर अत्यंत धडाडीने काम करत होते. त्यांनी दाऊदसह अन्य गँगस्टर्सशी संबंधित अनधिकृत बांधकामं तोडून टाकली होती. मतदारसंघाची संपूर्ण माहिती शिरुरकरांना (Udaykumar Shirurkar in Mumbadevi Constituency) आहे.
दुसरीकडे, भाजपकडे असलेला हा मतदारसंघ यंदा युतीमध्ये शिवसेनेला सोडण्यात आला आहे. शिवसेनेने विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांना तिकीट दिलं आहे. 1990 ते 2004 या कालावधीत मुंबादेवी मतदारसंघातून भाजपचे राज पुरोहित निवडून येत होते. त्यानंतर राज पुरोहित हे कुलाबा मतदारसंघातून निवडून आले.
विनोद तावडेंचा नियतीनेच ‘विनोद’ केला, अशोक चव्हाणांचे चिमटे
मुंबादेवी मतदारसंघातून एकूण 16 उमेदवार रिंगणात आहे. त्यातील पांडुरंग सकपाळ, मनसेचे केशव मुळ्ये आणि अपक्ष उदयकुमार शिरुरकर वगळता उर्वरित 13 उमेदवार हे मुस्लिम समाजाचे आहेत.
2014 मधील विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवली असता भाजपचे अतुल शहा हे दुसर्या, तर शिवसेनेच्या युगंधरा साळेकर या चौथ्या स्थानावर होत्या. भाजपसाठी हा मतदारसंघ अनुकूल असतानाही सेनेला सोडला गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
यापूर्वी ‘डी’ विभाग कार्यालयाचे अभियंता राजेंद्र नरवणकर हे काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे उदयकुमार शिरुरकुमारांना जनता स्वीकारणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.